21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeदेशाचे भविष्य उज्ज्वल करण्याचे धाडस हे सैनिकच करू शकतात

देशाचे भविष्य उज्ज्वल करण्याचे धाडस हे सैनिकच करू शकतात

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
भारताच्या ७५ व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभर सगळीकडेच मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. देशातील प्रत्येक नागरीक स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवात सहभागी होत आहे. याच पार्श्वभूमीवर ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन या बँक कर्मचारी संघटनेच्या वतीने माजी सैनिकांप्रती कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. देशप्रेमाच्या जोरावर देशाचे भविष्य उज्ज्वल करण्याचे धाडस करतो, प्रसंगी जीवाची बाजी लावतो, तोच सैनिक देशाचे खरे आधारस्तंभ आहेत, असे प्रतिपादन बँक कर्मचा-यांचे नेते कॉ. धनंजय कुलकर्णी यांनी केले.

सध्या देश स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. या दिवसाला अविस्मरणीय करण्याच्या उद्देशाने ‘एआयबीओएमईएफ’ या बँक कर्मचारी संघटनेच्या वतीने ‘आझादी का अमृत महोत्सव’ सोहळ्यांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा पत्रक देणे, प्रभात फेरी रॅली तसेच माझी सैनिकांप्रति कृतज्ञता अशा कार्यकांचे आयोजन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर लातूर येथील बँक कर्मचा-यांच्या वतीने समतेचा संदेश देणारी प्रभात फेरी रॅली काढण्यात आली. तसेच अखंड देश, अखंड राष्ट्र, अखंड भारत हि भावना मनात बाळगून देशाला प्रेरणा देण्याचे काम माजी सैनिक करीत असतात म्हणूनच त्यांच्याप्रती कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन बँक ऑफ महाराष्ट्र, लातूर मुख्य शाखा येथे करण्यात आले. याप्रसंगी बोलताना बँक कर्मचा-यांचे नेते कॉ. धनंजय कुलकर्णी म्हणाले की, विपरीत परिस्थितीत राहून सैनिक हा देशाचे रक्षण करतो, म्हणूनच हेच खरे देशाचे आधारस्तंभ आहेत. स्वातंत्र्योत्तर कालखंडात देशावर अनेक युद्धे लादली गेली. काही युद्धे सीमेवर लढली गेली तर काही देशांतर्गत. आशा प्रत्येक प्रसंगी देशाच्या सीमांचे, देशवासीयांचे रक्षण करण्याच्या कामी स्वत:चा जीव धोक्यात घालून सैनिकांनी दिलेले योगदान अवर्णनीय आहे.

देशासाठी सर्वस्व अर्पण करण्यास सैन्यात दाखल होणा-या व आपला कार्यकाळ पूर्ण करून येणा-या अशा सर्वच माझी सैनिकांप्रति त्यांनी ऋ ण व्यक्त केले. बँक कर्मचारी हा ‘अर्थ-वीर’ असून त्यांनी शूरवीर माजी सैनिकांकडून प्रेरणा घ्यावी, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी ज्येष्ठ पत्रकार रामराव गवळी यांनी बँक कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्याची प्रशंसा केली व येणा-या काळात अशे कार्यक्रम करावेत म्हणून शुभेच्छा दिल्या.

सदरील कार्यक्रमाला लातूर जिल्ह्यातील माजी सैनिक विनोद साळवे, राजेंद्र कदम, गुट्टे, महादू एकलारे, खंडू बागले, गुलाब पिरजादे, मुंढे, बाळासाहेब जाधव, प्रदीप तोरे, मारुती यादव, उद्धव मोहिते, किशन बुट्टे, संतोष कटाळे, शंकर पवळे, मिरकले, गोपीनाथ गोरे, हादूळे, सुग्रीव वाघमारे, सुग्रीव जाधव, कुशल गिरी, गोविंद गुंडरे, रघुनाथ सूर्यवंशी, फुलचंद ढोरे, सोमवंशी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते माजी सैनिकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन कृतज्ञतापर सत्कार करण्यात आला. माजी सैनिकांनी मनोगत व्यक्त करत त्यांच्या कार्यकाळातील अविस्मरणीय क्षणांचे वर्णन केले. यावेळी लातूर शहरातील बँक कर्मचारी व अधिकारी यांनीही उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉ. उत्तम होळीकर यांनी केले तर सूत्रसंचलन कॉ. आदित्य देशपांडे यांनी केले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या