27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeभाजपच्या डावपेचांकडे देशाचे लक्ष

भाजपच्या डावपेचांकडे देशाचे लक्ष

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जिथे भाजपेत्तर पक्षाचे सरकार सत्तेत आहे तिथे ‘ऑपरेशन लोटस’च्या माध्यमातून सत्ता मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न असतो. यामुळे कॉँग्रेसला मध्यप्रदेश, अरुणाचल प्रदेश, गोवा आणि कर्नाटकात सत्ता गमवावी लागली. परंतु भाजपला राजस्थान, महाराष्ट्र आणि उत्तराखंडमध्ये तोंडघशी पडावे लागले. आता महाराष्ट्रात नव्याने सुरू करण्यात आलेल्या या ‘ऑपरेशन लोटस’मध्ये भाजपचे डावपेच कितपत यशस्वी होणार याकडे सा-यांचे लक्ष लागले आहे.

अरुणाचल प्रदेशात २०१६ मध्ये केवळ ११ जागा असलेल्या भाजपला सरकार स्थापन करता आले. ६० सदस्यांच्या विधानसभेत ३३ सदस्य असलेल्या पीपल्स पार्टीला गळाला लावणे भाजपला शक्य झाले होते. कर्नाटकमध्ये २०१९ मध्ये ‘कॉँग्रेस-जेडीएस आघाडी सरकारला पाडण्यातही भाजपला यश आले होते. आघाडीतील १६ आमदारांनी राजीनामा देऊन भाजपला मदत केली. त्यानंतर येडियुराप्पा मुख्यमंत्री झाले.

मध्यप्रदेशमध्ये २०२० मध्ये कॉँग्रेसचे सरकार होते. परंतु भाजपने राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे ज्योतिरादित्य शिंदे यांना हाताशी धरल्याने २० मार्च २०२० रोजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना राजीनामा द्यावा लागला. शिंदे यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर कॉँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामा दिला होता. त्यात ६ विद्यमान मंत्र्यांचा समावेश होता. विधानसभेत २३० सदस्य असलेल्या कॉँग्रेसला ११४ जागा मिळाल्या होत्या. समाजवादी पक्ष, बसप आणि अपक्षांच्या मदतीने स्थापन झालेले कॉँग्रेसचे सरकार सव्वा वर्षातच पाडण्यात भाजपला यश आले.

राजस्थान, महाराष्ट्र आणि उत्तराखंडातील भाजपचा प्रयोग फसला. महाराष्ट्रात २०१९ मध्ये शिवसेना मुख्यमंत्री पदावरून भाजपसोबत समझोता करायला तयार नव्हती. महाविकास आघाडीची तयारी सुरू असतानाच भल्या पहाटे भाजपचे शपथविधीनाट्य तीन दिवसांतच फसला. भाजपने २०१६ मध्ये उत्तराखंडमध्ये हरीश रावत सरकारला धक्का देण्याचा प्रयत्न केला. इथे राष्ट्रपती राजवट लावण्यात आली. परंतु दोन महिन्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हरीश रावत यांचे सरकार पुन्हा स्थापन झाले.
गोव्यात २०१७ मध्ये कॉँग्रेस सर्वात मोठा पक्ष होता. त्यांच्याकडे १७ तर भाजपकडे १३ जागा होत्या. बहुमतासाठी २१ आमदारांची गरज होती. इथे सरकार बनविण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाठविण्यात आले. कमी सदस्य असतानाही भाजपचे सरकार बनले. कॉँग्रेसने दिग्विजय सिंह यांना सरकार बनवायला गोव्यात पाठवले होते. ते गोव्यातील हॉटेलमधून बाहेर येण्याच्या आधीच त्यांना भाजप सरकार बनवित असल्याची बातमी मिळाली.

मध्यप्रदेशप्रमाणेच भाजपने जुलै २०२० मध्ये उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची चाचपणी केली. पायलट यांनी १८ समर्थक आमदारांचा एक गट तयार केला. हे आमदार मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला जाणेही टाळत होते. हे सगळे आमदार हरियाणा येथील एका रिसॉर्टमध्ये थांबले होते. भाजपचे सरकार असलेल्या हरियाणामध्ये राज्य पोलिसांनी राजस्थान पोलिसांना कसे अडविले याच्या सुरस कथा आहेत. मुख्यमंत्री अशोक गहलोत, प्रियांका गांधी यांनी ‘ऑपरेशन लोटस’ हाणून पाडले होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या