मुंबई : विधानसभा बरखास्त करून मध्यावधी निवडणुकीला सामोरे जाण्याची आमची तयारी नाही. प्रसंगी आम्ही विरोधी पक्षात बसण्यास तयार आहोत, अशी भावना काँग्रेसच्या राज्यातील आमदारांनी पक्षाचे निरीक्षक व मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासमोर मांडल्याची माहिती कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
कमलनाथ यांना पक्षश्रेष्ठींनी राज्यात कालपासून सुरू झालेल्या जोरदार राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पाठविले आहे. त्यांनी आधी विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व काँग्रेस मंत्र्यांबरोबर थोरात यांच्या रॉयल स्टोन या शासकीय निवासस्थानी बैठक घेतली आणि नंतर आमदारांच्या भावनाही जाणून घेतल्या.
यावेळी पक्षाच्या आमदारांनी कमलनाथ यांना स्पष्ट शब्दांत सांगितले, की विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीला सामोरे जाण्याची आज आमची तयारी नाही. आताच कोरोनाचे संकट दूर झाले आहे. मतदारसंघांमधील विकासाच्या कामांना गती देता आलेली नाही. त्यामुळे लगेच निवडणुकीला तोंड देणे शक्य नाही.