कोल्हापूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील भुभागावर दावा केल्यानंतर सीमा प्रश्न पेटला आहे. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या आदेशानंतरही कर्नाटककडून चिथावणीखोर वक्तव्ये आणि दंडूकेशाही सुरू आहे. दरम्यान, आज बेळगावात आणि कोगनोळी टोलनाक्यावर कर्नाटक पोलिसांची दंडूकेशाही दिसून आली. कोगनोळी टोलनाक्यावर महाराष्ट्रातील आमदार हसन मुश्रीफ यांच्यावरही पोलिसांकडून लाठी उगारण्यात आल्या. तसेच इतरांची धरपकड करण्यात आली. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बेळगावमधील मराठी भाषिकांची होणारी गळचेपी रोखण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी मराठी भाषिक करत आहेत. दरम्यान, कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज महाराष्ट्र एकीकरण समितीकडून महामेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र, हा मेळावा होऊच नये आणि महाराष्ट्रातील नेतेही या मेळाव्यासाठी पोहोचू नयेत, यासाठी कर्नाटक पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आला.
एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना डांबले
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना आज कर्नाटक पोलिसांनी डांबून ठेवले होते. मराठी भाषिकांचा मेळावा होऊ न देण्यासाठी ही दडपशाही करण्यात आली होती. संध्याकाळी या नेत्यांना सोडून देण्यात आले.
कोगनोळी टोलनाक्यावर आंदोलन
एकीकरण समितीकडून आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांना बंदी घालण्यात आली होती. मात्र, कोल्हापुरातील महाविकास आघाडीचे नेते बेळगावला जाण्यावर ठाम होते. कर्नाटक पोलिसांनी कोल्हापुरातील नेते बेळगावला पोहोचू नयेत, यासाठी हजारो पोलिस तैनात केले होते. यावेळी पोलिसांचा विरोध झुगारून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह नेते, कार्यकर्त्यांवर लाठी उगारण्यात आली.