पुणे : बुधवारी दिवसभरही शहर व परिसरात पावसाचा जोर कायम राहील, तर निवडक ठिकाणी संततधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मान्सूनने आता संपूर्ण देश व्यापला असून, महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर तो सक्रिय झाला आहे. कोल्हापूर, सांगली भागात अतिवृष्टी झाली असून, उर्वरित राज्यातही मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे. पुणे आणि नाशिक शहरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे शहरात बुधवारी सकाळपासूनच हलक्या ते मध्यम सरीच्या पावसाने हजेरी लावली आहे. शहरात मंगळवारी रात्रीपर्यंत २.८ मिमी इतका पाऊस झाला. शहराला पाणीपुरवठा करणा-या धारण क्षेत्रात देखील चांगला पाऊस झाला आहे.मंगळवारी रात्रीपर्यंत टेमघर ३० मिमी, पानशेत २१ मिमी, वरसगाव २० मिमी तर खडकवासला धरण क्षेत्रात १० मिमी इतका पाऊस झाला. येत्या ३ दिवसांत पुण्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दुस-या बाजूला पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत राज्यातील समुद्रकिनारी असलेल्या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर, सातारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज ते रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. याच पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या १७ तुकड्या तैनात केल्या गेल्या आहेत. यातील ५ टीम मुंबईत, २ टीम प्रत्येकी कोल्हापूर, ठाणे, रत्नागिरी आणि रायगडमध्ये दाखल झाल्या आहेत, अशी माहिती श्रीवास्तव यांनी दिली आहे.
मुंबईच्या समुद्रात दुपारी ४ वाजून ४९ मिनिटांनी मोठी भरती येणार आहे. यात ३.२७ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबईत सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे दुपारपर्यंत पाऊस कायम राहिल्यास सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे सरकलेला मान्सूनचा आस, अरबी समुद्रावरून वाहणारे जोरदार प्रवाह यामुळे पुण्यासह राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. पुणे शहरात मंगळवारी रात्री सरासरी २० मिलीमीटर पाऊस पडला, तर चिंचवड परिसरात तब्बल ५४.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मान्सून दाखल झाल्यानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे. बुधवारी (ता. ६) पहाटे तीन वाजता हवामान खात्याने घेतलेल्या नोंदीवरून हे स्पष्ट झाले आहे.
पंचगंगा नदीची पाणी पातळी ३० फुटांवर
कोल्हापूर जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून नदीची पाणी पातळी ३० फुटांच्या वर पोहोचली आहे. तसेच जिल्ह्यातील एकूण २३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे प्रशासनाने तेथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या दोन टीम देखील कोल्हापुरात दाखल झाल्या आहेत. एक टीम कोल्हापूर शहर तर दुसरी टीम शिरोळ तालुक्यामध्ये तैनात केली आहे. राधानगरी धरणाच्या कृत्रिम दरवाजातून ११०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पात्रात सोडला आहे.
मुंबईमध्ये ७ जुलै रोजी अतिवृष्टीचा अंदाज
राज्यातील अनेक भागात कालपासून संततधार सुरू असून, मुंबई, कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. दरम्यान, हवामान विभागातर्फे मुंबईमध्ये आगामी चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच ७ आणि ८ जुलै रोजी अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वाढत्या पावसाचा अंदाज बघता प्रशासनातर्फे नागरिकांना सावध राहण्याचा तसेच अत्यावश्यक असल्यासच घराबाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.