हिंसाचाराचा भडका, राजपक्षेंनी नौदल तळावर घेतला आश्रय
कोलंबो : श्रीलंकेतील आर्थिक संकटामुळे देशभर असंतोष वाढला असून, यामुळे आता गृहयुद्ध भडकण्याची चिन्हे आहेत. सोमवारी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी विरोधकांच्या दबावाखाली राजीनामा दिला. त्यानंतर नाराज झालेल्या समर्थकांनी राजधानी कोलंबोत हिंसक घटना घडवून आणल्या. यानंतर त्यांचे विरोधकही संतापले. यातून हिंसाचाराचा भडका उडाला आहे. दरम्यान, श्रीलंकेचा कारभार आता संरक्षण दलांच्या हातात गेला असून, हिंसक आंदोलन थांबवण्यासाठी श्रीलंकेच्या संरक्षण विभागाने सैन्याला रस्त्यावर दिसेल, त्याला गोळी मारण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे आणि त्यांच्या कुटुंबाने पूर्व श्रीलंकेतील त्रिकोमाली नौदल तळावर आश्रय घेतला आहे. त्यांना हेलिकॉप्टरने तळावर नेण्यात आले. याची माहिती मिळताच तळाबाहेर आंदोलकांची गर्दी जमली. दरम्यान, श्रीलंकेतील हिंसाचारात ८ जणांचा मृत्यू झाला, तर २०० हून अधिक लोक जखमी झाले. संतप्त जमावाने राजकीय नेत्यांना लक्ष्य केले असून, ठिकठिकाणी घराला आग लावण्याचे प्रकार घडले आहेत. आंदोलकांनी हंबनटोटा येथील महिंदा राजपक्षे यांचे वडिलोपार्जित घर जाळले. त्याचवेळी राजधानी कोलंबोत माजी मंत्री जॉन्सन फर्नांडो यांना कारसह तलावात फेकण्यात आले. आतापर्यंत १२ हून अधिक मंत्र्यांची घरे जाळली गेली आहेत. श्रीलंकेचे खासदार जनक बंदारा तेनाकून यांच्या दांबुला येथील घराला आग लागली. माजी मंत्री रोहिता अबेगुनवर्धने यांच्या निवासस्थानावर आंदोलकांनी हल्ला केला.
पंतप्रधानांच्या निवासस्थानात गोळीबार
हजारो आंदोलकांनी राजपक्षे यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या टेम्पल ट्रीचे मुख्य गेट तोडले आणि येथे उभ्या असलेल्या ट्रकला आग लावण्यात आली. यानंतर निवासस्थानाच्या आतही गोळीबार करण्यात आला. आंदोलक जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि हवेत गोळीबार केला.