27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeक्रीडापाकला धूळ चारली

पाकला धूळ चारली

एकमत ऑनलाईन

वचपा काढला, टीम इंडियाचा रोमहर्षक विजय
दुबई : भारताने १० महिन्यानंतर झालेल्या त्याच मैदानातील सामन्यात पराभवाचा बदला घेतला. पाकिस्तानने भारतापुढे विजयासाठी १४८ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहली आणि रोहित शर्मा मोक्याच्या क्षणी बाद झाले. पण त्यानंतर रवींद्र जडेजा आणि हार्दिक पंड्या यांनी दमदार फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. जडेजाने ३५ धावांची दमदार खेळी साकारली, तर हार्दिकने (नाबाद ३३) अखेरच्या षटकार लगावत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

पाकिस्तानच्या १४८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची चांगली सुरुवात झाली नाही. कारण डावाच्या दुस-याच चेंडूवर भारताचा सलमावीर लोकेश राहुल बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली ही अनुभवी जोडी खेळपट्टीवर होती. पण रोहितला या सामन्यात लय सापडल्याचे पाहायला मिळाले नाही. कारण रोहित धावा जमवण्यासाठी झगडत होता. पण त्याचवेळी विराट आक्रमक खेळ करत होता. पण थोड्यावेळात स्थिरस्थावर झाल्यावर रोहितने मोठे फटके खेळायला सुरुवात केली. पण रोहितची ही फटकेबाजी अल्पायुषी ठरली. रोहितला यावेळी १८ चेंडूंत १२ धावा केल्या. रोहित बाद झाल्यावर कोहलीवर संघाची जबाबदारी होती. पण काही चेंडूंमध्येच कोहलीने आपली विकेट आंदण दिली. त्यामुळे भारत अडचणीत सापडला. कोहलीने ३४ चेंडूंत ३५ धावा केल्या.

रोहित आणि कोहली बाद झाल्यावर काही काळ रवींद्र जडेजा आणि सूर्यकुमार यादव यांनी थोडाफार प्रतिकार केला. पण सूर्यकुमार १८ धावांवर बाद झाला. पण त्यानंतर फलंदाजीला आलेल्या हार्दिक पंड्याने आक्रमक सुरुवात केली. त्याला जडेजाही चांगली साथ देत होता. ४ षटके बाकी असताना स्थिती नाजूक बनत चालली होती. मात्र, त्यानंतर जडेजा आणि पंड्या आक्रमक फलंदाजी करण्याच्या प्रयत्नात होते. त्यामुळे विजय टप्प्यात आणण्यात या जोडीला यश आले. अखेरच्या षटकात ६ चेंडूत ७ धावांची गरज होती. त्यावेळी पहिल्याच चेंडूवर जडेजा षटकार ठोकण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, त्याचवेळी त्याचा त्रिफळा उडाला. त्यानंतर दिनेश कार्तिक आला. त्याने एक धाव पूर्ण केली. त्यानंतरच्या चेंडूवर पंड्याने षटकार खेचत विजयावर शिक्कामोर्तब केले.

गोलंदाजांची कमाल
भारताच्या गोलंदाजांनी पाकच्या नाकात दम आणला. भुवनेश्वर कुमारने आपला अनुभव पणाला लावत चार मोलाच्या विकेट्स मिळवून दिल्या. दुसरीकडे हार्दिक पंड्यानेही पाकला तिहेरी धक्के दिले. त्यामुळे पाकचे कंबरडे मोडले. सहाव्या षटकात आवेश खानने फखर जमानला बाद केले. एकानंतर एक विकेट पडत गेल्याने पाकला दीडशेचाही टप्पा गाठता आला नाही.

विराटचा विक्रम
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने आशिया कप २०२२ च्या पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात मैदानात उतरताच इतिहास रचला. टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी १०० सामने खेळणारा कोहली दुसरा फलंदाज तसेच क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतासाठी १०० सामने खेळणारा पहिला फलंदाज ठरला.

हार्दिकचा विजयी षटकार
रोमहर्षक सामन्यात अखेरच्या षटकात भारताला विजयासाठी ६ चेंडूत ७ धावांची गरज होती. अखेरच्या षटकात मोहमद नवाजने पहिल्याच चेंडूवर जडेजाचा त्रिफळा उडविला. दुस-या चेंडूवर दिनेश कार्तिक १ धाव काढून पंड्याला फलंदाजीची संधी दिली. त्यानंतर तिस-या चेंडूवर हार्दिकने षटकार ठोकून विजयावर शिक्कामोर्तब केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या