25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeक्रीडारोमांचक सामन्यात पाकचा विजय

रोमांचक सामन्यात पाकचा विजय

एकमत ऑनलाईन

अफगाणिस्तानच्या भेदक मा-यात पाकिस्तान घायाळ
पाकिस्तान-श्रीलंकेत अंतिम लढत
दुबई : रोमांचक सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा एक विकेटने पराभव केला. पाकिस्तानच्या विजयासह भारताचे आशिया चषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषकाचा अंतिम सामना होणार आहे. श्रीलंका आणि पाकिस्तान संघाने सुपर ४ मध्ये प्रत्येकी २-२ सामने जिंकत फायनलचे तिकिट मिळवले आहे.

अफगाणिस्तानने दिलेले १३० धावांचे आव्हान पाकिस्तानने अखेरच्या षटकात एक गडी आणि चार चेंडू राखून पार केले. वेगवान गोलंदाज नसीम शाहने २ खणखणीत षटकार लगावत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. या विजयासह पाकिस्तानने फायनलचे तिकिट पक्के केले आहे.

पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकत अफगाणिस्तानला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. इब्राहिम झद्रान याच्या ३५ धावांच्या खेळीच्या बळावर अफगाणिस्तान संघाने निर्धारित २० षटकात सहा गड्यांच्या मोबदल्यात १२९ धावांपर्यंत मजल मारली होती. हजरतुल्ला झझाई, रहमानुल्ला गुरबज, करीम जनत, नजीबुल्लाह जद्रान आणि कर्णधार मोहम्मद नबी यांना आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. पाकिस्तानकडून हॅरिस रऊफने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.

अफगाणिस्तानने दिलेल्या १३० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. कर्णधार बाबर आझम एकही धाव न काढता बाद झाला. त्यानंतर फखर जमानही तंबूत परतला. पाकिस्तानच्या अडचणीत वाढ झाली होती. त्यावेळी पुन्हा एकदा रिझवानने संयमी फलंदाजी केली. रिझवान बाद झाल्यानंतर पाकिस्तानचा डाव ढासळतोय, असे वाटत होते. पण शदाब खान आणि इफ्तिखार अहमद यांनी सामना फिरवला. शदाब खानने ३० तर अहमदने ३६ धावांची खेळी केली. याच वेळी मोक्याच्या क्षणी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत एकापाठोपाठ एक विकेट घेतल्या.

अखेरच्या ६ चेंडूत पाकिस्तानला विजयासाठी १२ धावांची गरज होती आणि हातात फक्त एक विकेट… त्यावेळी गोलंदाज नसीम शाहने दोन खणखणीत षटकार मारत सामना जिंकून दिला. अफगाणिस्तानकडून फजल हक आणि फरीद अहमद यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या, तर राशिद खानने दोन विकेट घेतल्या.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या