27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeमहाराष्ट्रविधानसभेत पाटील - फडणवीस जुगलबंदी रंगली

विधानसभेत पाटील – फडणवीस जुगलबंदी रंगली

एकमत ऑनलाईन

जयंत पाटलांचा राज्यपालांना टोला, शिंदेंना चिमटा

मुंबई : विधानसभा सभागृहात नेहमी कोणत्या ना कोणत्या नेत्यांची जुगलबंदी रंगलेली असते. अनेक सदस्य यावेळी एकमेकांची टोपी उडवताना दिसतात. एकमेकांना चिमटे काढताना दिसतात. आजही विधानसभेत हे चित्र पाहायला मिळाले. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात ही जुगलबंदी रंगली.

त्याला निमित्तही तसंच ठरलं. ते म्हणजे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी. जयंत पाटील हे सभागृहात उभे राहिले. त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे अभिनंदन करत चिमटे काढले. कोश्यारी आधीच्या सरकारबाबत कसे दुजाभाव करत होते, यावरून राज्यपालांना टोले लगावले. आमच्या काळात विधानसभा अध्यपक्षपदाची निवडणूक राज्यपालांनी घेतली नाही. पण भाजपचे सरकार येताच ही निवडणूक घेतली, असा पाटील यांच्या बोलण्याचा रोख होता.

त्यानंतर फडणवीस बोलायला उभे राहिले आणि त्यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांचे आभार मानले. त्यांच्यामुळेच आम्हाला हा दिवस पाहायला मिळाल्याचे सांगत फडणवीस यांनी टोले लगावले. त्यामुळे एकच खसखस पिकली.

आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होती. त्यासाठी विधानसभेचे अधिवेशन बोलावण्यात आले होते. मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच जयंत पाटील बोलायला उभे राहिले. त्यांनी आपल्या भाषणातून राज्यपालांना टोले लगावले. मी राज्यपालांचे आभार मानण्यासाठी उभा आहे. गेले अनेक महिने विधानसभेला याची प्रतीक्षा होती.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी अशी आमच्या सरकारकडून वारंवार विनंती करण्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सत्ताधारी आमदारांनी राज्यपालांना भेटून वारंवार विनंतीही केली होती. पण राज्यपालांनी ती मान्य केली नाही. ते कशाची वाट पाहत होते हे आज आमच्या लक्षात आले. ते त्यांनी आधीच सांगितले असते तर कदाचित एकनाथरावांनी हे यापूर्वीच केले असते, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

आता विधान परिषद सदस्यांची नावे मंजूर करा
आता राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली. त्याबद्दल त्यांचे आभार मानावेत. महाराष्ट्र आणि देशाला राज्यपाल कसा आदर्श घालू शकतो हा एक आदर्श राज्यपालांनी घातला आहे. राज्यपालांना आता विनंती आहे की, त्यांनी विधान परिषदेच्या १२ सदस्यांची नावे मंजूर करावी. आम्ही पाठवल्याप्रमाणे मंजूर करावी. राज्यपाल सर्वांशी समान वागले हा संदेश त्यामुळे जाईल, असा चिमटाही त्यांनी काढला.

नानाभाऊंचे आभार
जयंत पाटील यांचे बोलून झाल्यानंतर तात्काळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलायला उभे राहिले. मी नाना पटोलेंचे आभार मानतो. त्यांच्यामुळे आम्हाला हा दिवस पाहायला मिळाला. ते आमचे मित्रच आहेत. ते मैत्रीला जागले म्हणून आभार मानतो, असे फडणवीस यांनी म्हणताच सभागृहात एकच खसखस पिकली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या