लोकसभेची तयारी, राष्ट्रवादीची नेत्यांवर जबाबदारी, ठाकरे गट भाकरी फिरविणार
मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत भाकरी फिरवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतील लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाने उमेदवारच बदलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही लोकसभेची तयारी सुरू केली असून, प्रमुख नेत्यांवर मतदारसंघनिहाय जबाबदारी सोपविली आहे. आज झालेल्या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला.
ठाकरे गटाने दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्याऐवजी राज्यसभा खासदार अनिल देसाई यांच्या नावाला पसंती असल्याचे सांगण्यात येत आहे तर अरविंद सावंत यांना उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्याविरोधात उतरण्यात येणार आहे.
याशिवाय दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर किंवा माजी महापौर विशाखा राऊत यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तसेच शिवसेना ठाकरे गट मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून माजी महापौर आणि विद्यमान प्रतोद सुनिल प्रभू यांना उमेदवारी देण्याची तयारी करत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिका घेत मतदारसंघात उमेदवारांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. लोकसभा निवडणुकीला एक वर्षाचा कालावधी असला तरी आतापासूनच ठाकरे गटाच्या उमेदवारांना मतदारसंघात तयारीला लागा असे आदेश देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.
शिवसेना ठाकरे गट ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातून माजी खासदार संजय दिना पाटीलकिंवा महाविकास आघाडीत जागावाटपात अदलाबदल झाल्यास दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्यासंदर्भात अंतिम चर्चा सुरू असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.
राष्ट्रवादीने आखली रणनीती
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर चर्चा झाली. महाविकास आघाडीत कोणत्या जागेवर लढायचे आणि कोणत्या जागेवर पाठिंबा द्यायचा याबाबत रणनीती ठरवण्यात आली. दरम्यान तालुका आणि जिल्हा अध्यक्षदेखील बदलण्यात येणार असून जे सलग तीन टर्म अध्यक्ष राहिले आहेत, त्यांना बढती देण्याचा मोठा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.