नवी दिल्ली : सुप्रसिद्ध बॉक्सर विजेंदर सिंगने आंदोलक कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन केंद सरकारवर हल्लाबोल केला आहे. या पत्रकार परिषदेत विजेंदर सिंग म्हणे की, अनेकांना ऑलिम्पिक म्हणजे काय हे माहितही नसेल. अनेक जण गुटखा खातात आणि म्हणतात की ऑलिम्पिक पदकच नाही तर आमचे पैसेही द्या, सरकारला हवे असेल तर आम्हीही पैसे देऊ. आधी पदक आणून दाखवा, मग बोला. असा टोला त्यांनी भाजपच्या नेत्यांना लगावला.
ते म्हणाले की, काल आमच्या बहिणी गंगेत पदके विसर्जित करायला गेल्या असताना अचानक मला जगातील महान बॉक्सर मोहम्मद अलीची आठवण झाली. अमेरिकेत कृष्णवर्णीय असल्यामुळे त्याच्याशी भेदभाव झाला तेव्हा त्याने आपले ऑलिम्पिक पदक नदीत फेकले. त्यानंतर अमेरिकेत एक प्रकारची क्रांती झाली होती. आमच्या बहिणी गंगेत पदक विसर्जित करायला गेल्या तेंव्हा त्यांचा धर्म तपासला गेला आणि त्यांची जात विचारण्यात आली. सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया पाहिल्या. हे अत्यंत दुर्दैवी आहे. असे ते म्हणाले.