नवी दिल्ली (प्रतिनिधी): करोनावर लस येत नाही तोपर्यंत करोनासोबत जगावे लागणार असल्याचे स्पष्ट करीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज दिल्लीत सार्वजनिक वाहतूक सुरू करायला हिरवी झेंडी दिली.
अरविंद केजरीवाल म्हणाले, केंद्र सरकारच्या आदेशानुसार लॉकडाउनचा चौथा टप्पा 31 मे पर्यंत राहणार आहे. मात्र, सामान्य जनजीवन रूळावर आणणे हेही महत्वाचे आहे. यामुळे सरकारी आणि खासगी कार्यालय सुरू करण्याला परवानगी दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
Read More क्रीडा रसिकांसाठी गोड बातमी
करोनावरची लस लगेच येईल असे चित्र नाही. यामुळे आपल्याला करोनासोबत जगण्याची सवय लावावी लागेल. सरकारने लॉकडाउनच्या काळात महामारीशी लढण्याची तयारी पूर्ण केली आहे. आता अर्थव्यवस्थेकडे लक्ष देण्याची गरज आहे.
दिल्लीत ऑटो रिक्षा, ई-रिक्षा आणि सायकल रिक्षाची सेवा सुरू केली जात आहे. परंतु, यात फक्त एकाच प्रवाशाला बसविता येईल. दुचाकी वाहन एकट्यालाच चालवावे लागेल. टॅक्सी आणि कॅबमध्ये दोन प्रवाशांना बसता येईल. याशिवाय सरकारी बसेसही सुरू केल्या जात आहेत. मात्र, बसमध्ये फक्त 20 प्रवाशांना प्रवेश दिला जाईल. बसचा प्रवास करताना सोशल डिस्टंसिंगचे पालन महत्वाचे आहे. सॅनिटायजेशनची जबाबदारी ड्रायव्हरवर असेल.
तसेच मार्केटला सुध्दा परवानगी दिली जात आहे. यातील दुकाने ऑड ईवन हिशेबाने सुरू केली जातील. प्रत्येक दुकानात सोशल डिस्टंसिंगचे पालन बंधनकारक आहे. अन्यथा दुकानदारावर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र कंटेनमेंट परिसरात काहीही सुरू करता येणार नाही.
हे राहणार बंदच
1. सलून आणि स्पा
2. मेट्रो, शाळा आणि कॉलेज
3. हॉटेल, रेस्टॉरंट, सिनेमा हॉल, मॉल, स्वीमिंग पूल आणि जीम
4. राजकीय आणि धार्मिक कार्यक्रम, प्रार्थना सभा