मथुरा : मथुरेतील कृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मशीद वादावरही न्यायालयात सुनावणी होणार असून, मथुरा जिल्हा न्यायालयाने या प्रकरणी खटला चालवण्यास परवानगी दिली आहे. दिवाणी न्यायाधीशांच्या निर्णयाला आव्हान देणा-या याचिकेवर जिल्हा न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
त्यामुळे कृष्ण जन्मभूमीला लागून असलेली शाही ईदगाह मशीद हटवण्याच्या याचिकेवर न्यायालयीन कामकाजाचा मार्ग मोकळा झाला आहे. मथुरा जिल्हा न्यायालयात कृष्ण जन्मभूमी-ईदगाह मशीद वादाची सुनावणी ६ मे रोजी पूर्ण झाली होती. त्यामध्ये सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर निर्णय राखून ठेवण्यात आला होता.
याचिकेत श्रीकृष्णाच्या जन्मस्थानाची १३.३७ एकर जमीन परत मिळावी, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे. तसेच यामध्ये सुमारे चारशे वर्षांपूर्वी औरंगजेबाच्या आदेशाने त्यातील मोठ्या भागावरील मंदिर पाडल्यानंतर त्या जागेवर बेकायदेशीरपणे कब्जा करून केशवदेव टिळा आणि शाही ईदगाह मशीद बांधण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.