मुंबई : केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केल्यानंतर रविवार दि. २२ मे रोजी राज्य सरकारनेही सर्वसामान्यांना दिलासा देत पेट्रोलच्या दरात २ रुपये ८ पैसे आणि डिझेलच्या दरात १ रुपये ४४ पैशांची कपात केली आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने रविवारी महत्वाचा निर्णय घेत राज्यातील सामान्य जनतेला अबकारी कर कमी करीत दिलासा दिला. तत्पूर्वी शनिवारी केंद्र सरकारने अबकारी करात पेट्रोलच्या दरात ८ रुपयांनी तर डिझेलच्या दरात ६ रुपयांनी कपात केली. यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यांना पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करावे, असे आवाहन केले होते. केंद्राने व्हॅटमध्ये कपात केल्यानंतर राजस्थान आणि केरळने आपल्या राज्यात पेट्रोल-डिझेलच्या व्हॅटमध्ये कपात केली होती. यानंतर महाविकास आघाडी सरकारवरही दडपण होते, त्यानंतर रविवारी पेट्रोल-डिझेलच्या व्हॅटमध्ये कपात करण्याचा निर्णय राज्य सरकराने घेतला आहे.या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर वार्षिक अडीच हजार कोटींचा बोजा पडणार आहे.
पेट्रोल-डिझेलचे नवे दर
राज्यसरकारने पेट्रोलच्या दरात २ रुपये ८ पैसे आणि डिझेलच्या दरात १ रुपये ४४ पैशांची कपात केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने कमी केलेल्या करामुळे पेट्रोल ११ रुपये ५८ पैशांनी स्वस्त झाले आहे. तर डिझेलच्या दरात ८ रुपये ४४ पैशांनी स्वस्त झाले आहे.
आजपासून नवे दर लागू
देशातील सर्वसामान्यांना केंद्र आणि राज्य सरकारने शनिवार आणि रविवार असे दोन दिवस इंधनदर कपातीचे दोन सुखद धक्के देत दिलासा दिला असून केंद्राने कर कपात केल्यानंतर रविवारीपासून नवे दर लागू केले होते. तर राज्यांतील इंधनाचे नवे दर सोमवार दि. २३ मेच्या सकाळपासून लागू होणार आहेत.
केरळने कमी केला व्हॅट
केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरील दरात कपात केल्यानंतर केरळ सरकारनेही व्हॅटमध्ये कपात करण्याची घोषणा केली. शनिवारी केरळने पेट्रोल आणि डिझेलवरील राज्य कर अनुक्रमे २.४१ रुपये आणि १.३६ रुपये प्रति लिटरने कमी करण्याची घोषणा केली.
राजस्थान, ओडिशामध्येही इंधन स्वस्त
राजस्थान सरकारने पेट्रोलवरील व्हॅट २.४८ रुपयांनी आणि डिझेलवरील १.१६ रुपयांनी कमी केले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्यामुळे राज्य सरकार पेट्रोलवरील व्हॅट २.४८ रुपये आणि डिझेलवर १.१६ रुपये प्रति लिटरने कमी करत आहे. त्यामुळे राज्यात पेट्रोल १०.४८ रुपयांनी आणि डिझेल ७.१६ रुपयांनी स्वस्त होणार आहे. याशिवाय, ओडिशा सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर अनुक्रमे २.२३ रुपये आणि १.३६ रुपये प्रति लिटरने कमी केले आहे. या कपातीनंतर ओडिशात पेट्रोलची नवीनकिंमत १०२.२५ रुपये आणि डिझेल ९४.८६ रुपये प्रति लिटर आहे.