Saturday, September 23, 2023

नीती आयोगाचा सल्ला : तीन मोठ्या सरकारी बँकांचे खाजगीकरण?

पंजाब आणि सिंध, युको आणि बँक ऑफ महाराष्ट्राचा समावेश!

नवी दिल्ली : नीती आयोगाने सरकारला सार्वजनिक क्षेत्रातील तीन बँकांचे खाजगीकरण करण्याची सूचना केली आहे. त्यामध्ये पंजाब आणि सिंध बँक, युको बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्रचा समावेश आहे. विशेष म्हणजे सर्व ग्रामीण बँकांचे विलीनीकरणदेखील सूचिवले आहे. त्यामुळे सरकार याचा विचार करू शकते. यासोबतच एनबीएफसींना अधिक सूट देण्याबाबतची चर्चाही सुरू आहे. त्यामुळे याबाबत सरकार काय भूमिका घेते, याकडे लक्ष असणार आहे.

भारत सरकार आपल्या सार्वजनिक क्षेत्रातील निम्म्याहून अधिक बँकांचे खाजगीकरण करण्याचा विचार करीत आहे. त्यांची संख्या कमी करून पाच करण्याची सरकारची योजना आहे. बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँक यांचे समभाग विकून याची सुरुवात होणार आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँक आणि एनबीएफसीच्या प्रमुखांची बैठक घेऊन चर्चा केली आणि बँकिंग क्षेत्राला पुन्हा मार्गावर आणण्याची चर्चा सुरू झाली.

मुळात देशात कमीत कमी बँका ठेवण्याचे मोदी सरकारचे धोरण आहे. त्यामुळे आतापर्यंत ब-याच बँकांचे विलिनीकरण केले आहे. त्यातच काही बँकांचे खाजगीकरण करण्याचा विचारही सुरू झाला आहे. त्यातच नीती आयोगाने तीन बँकांचे खाजगीकरण करण्याचा सल्ला दिल्याने यासंदर्भातही सरकार विचार करू शकते. कोरोनाच्या संकट काळात आर्थिक पातळीवर बरेच धाडसी निर्णय घेतले जात आहेत. त्यात यासंबंधीचा निर्णयही घेतली जाऊ शकतो.

या अगोदर आयडीबीआयचे
भागही एलआयसीला विकले
गेल्या वर्षी आयडीबीआय बँकेचा हिस्सादेखील सरकारने एलआयसीला विकला. त्यानंतर ही बँक खाजगी झाली. खरे तर आयडीबीआय ही एक सरकारी बँक होती. या बँकेची स्थापना १९६४ मध्ये झाली होती. केंद्र शासनाच्या निर्णयानंतर गेल्या वर्षी एलआयसीने २१००० कोटींची गुंतवणूक करून आयडीबीआयचा ५१ टक्के हिस्सा विकत घेतला. यानंतर एलआयसी आणि सरकारने मिळून आयडीबीआय बँकेला ९३०० कोटी रु. दिले. यात एलआयसीचा हिस्सा ४ हजार ७४३ कोटी रुपये होता.

खाजगीकरणानंतरही चालणार नियमित व्यवहार
नीती आयोगाने तीन बँकांच्या खाजगीकरणाचा सल्ला दिल्याने केंद्र सरकार याबाबत विचार करू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण कमीत कमी सार्वजनिक बँका ठेवण्याचा सरकारचा विचार आहे. आता या बँकांचे खाजगीकरण झाले, तर ग्राहकांचे काय होईल, असा प्रश्न सर्वांना भेडसावत आहे. यावर एस्कॉर्ट सेक्युरिटीचे संशोधन प्रमुख असिफ इक्बाल यांनी या निर्णयाचा ग्राहकांवर कोणताही विशेष परिणाम होणार नाही. कारण बँकेच्या सेवा पूर्वीसारख्याच सुरू राहणार आहेत, असे म्हटले आहे.

Read More  किल्लारीत कोरोनाचा शिरकाव

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या