सॅन फ्रॅन्सिस्को : सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी देशातील राजकीय पक्षांवर सडकून टीका केली आहे. कोर्टाने त्यांच्या भूमिकांचे समर्थन करावे असे राजकीय पक्षांना वाटते असे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्कोत असोसिएशन ऑफ इंडो-अमेरिकन जनतेकडून आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
सरन्यायाधीश रमणा म्हणाले, भारतात सत्ताधारी पक्षाला वाटते की त्यांच्या प्रत्येक सरकारी कारवाईचे न्यायालयाकडून समर्थन व्हायला हवे. तसेच विरोधी पक्ष देखील कोर्टाने आपला राजकीय अजेंडा पुढे न्यावा अशी अपेक्षा करतात. पण न्यायपालिका ही फक्त संविधान आणि संविधानाप्रती उत्तरदायी आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही लोक संविधानाने प्रत्येक संस्थांना दिलेल्या भूमिका आणि जबाबदा-या समजू शकलेले नाहीत. आम्ही यावर्षी स्वातंर्त्याच्या ७५व्या वर्षांचा सोहळा साजरा करत आहोत. तर आपले प्रजासत्ताक ७२ वर्षांचे झाले आहे. त्यामुळे मला या गोष्टीची खंत वाटते की, जनतेकडून अद्याप संविधानाने आपल्यावर सोपवलेल्या भूमिका आणि जबाबदा-यांचे पूर्णपणे कौतुक होत नाही.
ग्रामीण जनतेचे केले कौतुक
सरन्यायाधीशांनी भारताच्या ग्रामीण भागातील जनतेचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले की, आपल्या लोकांच्या सामूहिक बुद्धिमत्तेवर शंका घेण्याचे कारण नाही. महत्वाची गोष्ट ही आहे की, ग्रामीण भारतातील मतदार शहर, शिक्षण आणि संपन्नतेच्या तुलनेत अधिक सक्रिय आहेत.
लोकांचा सन्मान होणे गरजेचे
समाजातील विविध वर्गामध्ये विश्वास टिकवून ठेवण्यासाठी विविध पार्श्वभूमीच्या योग्य प्रतिभावंतांचा सन्मान करणे गरजेचे आहे असे सांगताना सरन्यायाधीश म्हणाले अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकांना सर्वसाधारण परिस्थितीतून अमेरिकेच्या निर्मितीत सक्रीय भूमिका निभावली आहे. त्यांनी केवळ आपली ओळखच नव्हे तर या देशाचा चेहरा देखील बदलून टाकला आहे.