मुंबई : भाजप नेते प्रवीण दरेकर यांची मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना मुंबई बँकेच्या अध्यक्षपदावरून प्रवीण दरेकर यांना अध्यक्षपद गमवावे लागले होते आता, राज्यात सत्तांतर झाल्यानंतरचा परिणाम आता दिसू लागला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
राज्यात नवीन सरकार आल्यानंतर मुंबई बँकेमध्ये सत्तांतर झाले आहे. सहकार क्षेत्रात मुंबई बँक ही प्रमुख बँकेपैकी एक असून प्रवीण दरेकर यांचे या बँकेवर वर्चस्व आहे. मात्र, मागील निवडणुकीत पॅनेलला चांगले यश मिळूनही दरेकर यांना संचालक मंडळाच्या अध्यक्षपदापासून दूर राहावे लागले होते. मुंबई बँकेच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई बँकेचे संचालक सिद्धार्थ कांबळे यांनी गेल्या आठवड्यात आपल्या अध्यक्षपदाचा पदाचा राजीनामा दिला होता. तर विठ्ठल भोसले यांनी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.
प्रविण दरेकर यांची गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई जिल्हा बँकेवर असलेली सत्ता महाविकास आघाडीने खेचून घेतली होती. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी स्वत: या वेळच्या निवडणुकीची सूत्रे हाती घेत भाजपच्या प्रवीण दरेकरांना धक्का दिला होता. त्यावेळी महाविकास आघाडीचे सिद्धार्थ कांबळे हे विजयी झाले होते, त्यांनी भाजपच्या प्रसाद लाड यांचा पराभव केला होता. राष्ट्रवादी काँगेसच्या सिद्धार्थ कांबळे यांना ११ मते मिळाली होती तर भाजपच्या प्रसाद लाड यांना ९ मते मिळाली होती.