मुंबई : कोकणात ठिकठिकाणी आज मुसळधार पाऊस झाला. तीन चार तास जोरदार पाऊस झाल्यानं रत्नागिरीतील चिपळून इथं पूरस्थिती निर्माण झाली. गेल्यावर्षी चिपळूनमध्ये पावसामुळे हाहाकार माजला होता. यापार्श्वभूमीवर या ठिकाणी एनडीआरएफच्या पाच टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
कोकणासह मुंबई आणि उपनगरांना हवामान खात्यानं ऑरेंज अॅलर्ट जाहीर केला आहे. गेल्यावर्षी चिपळूण शहरात पुरानं मोठा वेढा दिला होता. त्यामुळं अनेक घर आणि दुकानं पाण्याखाली गेल्यानं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं होतं. यापार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफच्या पाच तुकड्या चिपळून शहरात तैनात करण्यात आल्या आहेत. तर एक तुकडी रायगडमधील महाड इथं तैनात करण्यात आली आहे.
जोरदार पावसामुळं रत्नागिरी जिल्ह्यातून वाहणाऱ्या आठही नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. जगबुडी, वशिष्ठी, शास्त्री, सोनवी, काजळी, कोदवली, मुचकुंदी, बावनदी या नद्या जिल्ह्यातून वाहतात. यांपैकी जगबुडी आणि काजळी या दोन नद्या इशारा पातळीवरुन वाहत आहेत.
कोकणातील पाच जिल्हे तसेच मुंबई-ठाण्यासाठी हवामान खात्यानं पावसाचे अॅलर्ट जाहीर केले आहेत. यांपैकी पालघरला ४-५ जुलैला येलो अॅलर्ट तर ६ ते ८ जुलैसाठी ऑरेंज अॅलर्ट जाहीर केला आहे. तसेच ठाणे आणि मुंबई जिल्ह्यासाठी पुढील पाचही दिवस यलो अॅलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांसाठी पुढील पाचही दिवस ऑरेंज अॅलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर धुळ्यासाठी ग्रीन अॅलर्ट जाहीर करण्यात आला आहे.