24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeमहाराष्ट्रघरगुती वीज ग्राहकांना मोबाईलप्रमाणे प्रीपेड मीटरचा पर्याय

घरगुती वीज ग्राहकांना मोबाईलप्रमाणे प्रीपेड मीटरचा पर्याय

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.२०(प्रतिनिधी) मीटर रीडिंगबाबतच्या तक्रारी, त्यासाठी होणारा खर्च आणि विलंब व वाढती थकबाकी यावर उपाय म्हणून राज्यात लवकरच स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत. यामुळे ग्राहकांना मोबाईलप्रमाणे प्रीपेड व पोस्टपेड असे दोन्ही पर्याय उपलब्ध होणार आहेत. पहिल्या टप्प्यात मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद यासारख्या महानगरात स्मार्ट मीटर बसवण्यात येतील अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिली.

राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याबाबत आज मंत्रालयात ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे, मराविमं सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे, महावितरणचे संचालक(वित्त) रविंद्र सावंत, महावितरणचे कार्यकारी संचालक अरविंद भादीकर उपस्थित होते. स्मार्ट मीटर योजना प्रथम घरगुती ग्राहकांसाठी राबविण्यात येणार असून, यासाठी निविदा काढण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. केंद्र सरकारने अलीकडेच जारी केलेल्या निर्देशानुसार या निविदेत दुरुस्ती करण्याच्या सूचना ऊर्जामंत्री राऊत यांनी दिल्या.

‘अँडव्हान्स मिटरींग इन्फ्रास्ट्रक्चर या योजनेअंतर्गत देशभरात २५ कोटी स्मार्ट मीटर बसवले जाणार आहेत. वीज बिलांबाबत होणारे घोळ, तांत्रिक अडचणी व यंत्रणेवरचा ताण या स्मार्टमिटरमुळे कमी होणार आहे. शिवाय विजेच्या बचतीसाठीही स्मार्ट मीटर उपयोगी ठरणार आहेत. महाराष्ट्रातून या योजनेची सुरुवात घरगुती ग्राहकांपासून होणार आहे. हे मीटर मोबाईलप्रमाणे पोस्टपेड-प्रिपेड अशा दोन्ही प्रकारे वापरता येतील व मोबाईलप्रमाणेच त्यात रिचार्ज भरता येईल. स्मार्ट मीटरमुळे विजेचा किती वापर झाला याचे मीटर रीडिंग घेण्यासाठी प्रत्यक्ष कर्मचारी पाठवण्याची गरज लागणार नाही. कार्यालयातच वापरलेल्या विजेची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल. तसेच वीज चोरीला आळा बसणार आहे. मीटरसोबत छेडछाड होत असेल तर ती लगेच पकडता येईल.

मोबाईलच्या सिम कार्ड वापराप्रमाणे प्रीपेड आणि पोस्टपेड रुपात हे स्मार्ट मीटर उपलब्ध असतील. यामुळे ग्राहकांना आपल्या वीज वापरावर नियंत्रण ठेवता येईल. वीज वापरानुसारच बिल येईल तसेच प्रि पेड मीटरमध्ये तर जितके पैसे जमा आहेत त्यानुसारच वीज वापरता येईल.परिणामी विजेची बचत होण्यास यामुळे फायदा होईल, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले.

जीवनप्रकाश योजनेची व्याप्ती वाढवणार
अनुसूचित जाती व जमातीतील ग्राहकांना नाममात्र दरात वीज जोडणी देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनप्रकाश योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देशही डॉ.राऊत यांनी यावेळी दिले. गरजूंना नाममात्र अनामत रक्कम जमा करून वीज जोडणी देणारी ही योजना केवळ दोन समाजापुरती मर्यादित न राहता सर्वसमावेशक करायला हवी. यासाठी प्रस्ताव तयार करून सादर करा,असे निर्देश डॉ. राऊत यांनी दिले आहेत .

स्वप्नांची निर्घृण समाप्ती नको…!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या