बंगळूरू : कर्नाटकच्या मंगलोर विद्यापीठातील हिजाबचा वाद थांबण्याचे नाव घेत नाही आहे. शनिवार दि. २८ मे रोजी १२ विद्यार्थिनींनी हिजाब परिधान करून कॅम्पसमध्ये प्रवेश केला. या मुलींना वर्गात जाण्यास मज्जाव करण्यात आला. प्रकरण वाढल्याने महाविद्यालयाच्या शिक्षकांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुली आपल्या म्हणण्यावर ठाम होत्या.
प्राप्त माहितीनुसार, शनिवारी १२ विद्यार्थिनी हिजाब परिधान करून मंगळूर विद्यापीठ महाविद्यालयात आल्या. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनुसया राय यांना जेव्हा ही बाब समजली तेव्हा त्यांनी विद्यार्थिनींना सांगितले की, हिजाब काढून वर्गात प्रवेश करू शकतात. मात्र, आपण हिजाब काढणार नसल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले. त्यामुळे विद्यार्थिनींना वर्गात प्रवेश दिला जात नव्हता. यानंतर त्या लायब्ररीत पोहोचल्या. त्यांना तिथेही प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. विद्यार्थिनींना प्रवेश नाकारल्यानंतर घरी परतल्या. विद्यार्थिनींना हिजाब घालण्याची परवानगी नसल्याचा निर्णय महाविद्यालय विकास समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याचे कुलगुरू डॉ. सुब्रमण्य यादव यांनी सांगितले. विद्यार्थिनींना कॉलेजच्या आवारात हिजाब घालता येत असला तरी क्लास रूम किंवा लायब्ररीत जाताना हिजाब काढावा लागेल.