मुंबई, दि. २१(प्रतिनिधी)- कोरोनाच्या विषाणूची एकीकडे युध्दपातळीवर मुकाबला करण्यात शासकीय यंत्रणा गुंतल्या आहेत. तर दुसरीकडे सर्वांचेच लक्ष कोरोनाच्या लसीकडे लागले आहे. आयसीएमआरकडून कोरोना प्रतिबंधक लस आल्यावर सर्वप्रथम आरोग्य कर्मचा-यांना ही लस प्राधान्याने दिली जाईल, अशी घोषणा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने प्रदेश कार्यालयात आयोजित जनता दरबाराच्या निमित्ताने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केंद्र सरकारच्यावतीने आयसीएमआरकडून आरोग्य विभागाला काही सूचना आल्या आहेत. या लसींचा साठा येण्यापूर्वीच त्याची योग्य पध्दतीने पूर्वतयारी केली जात आहे. या लसी काही ठराविक तापमनात ठेवाव्या लागतात. त्यासाठी शीतगृह म्हणजेच कोल्ड स्टोरेज महत्त्वाचे आहे. ज्यांच्याकडे कोल्ड स्टोअरेजची सुविधा आहे अशा डिस्ट्रीब्युटरर्सशी संपर्क साधला जात आहे. याबाबत एक एसओपी आलेला आहे तो मेंटेन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी सध्या प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केले आहे. ऐनवेळी लस आल्यावर आयत्यावेळेस धावपळ करण्यापेक्षा पूर्वतयारी करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे, असे राजेश टोपे म्हणाले.
कोरोनाशी लढण्यात आरोग्य खात्याचे कर्मचारी पहिल्या फळीत काम करीत आहेत. त्यामुळे सध्या खासगी आणि सरकारी आरोग्य कर्मचा-यांची माहिती घेण्याचे काम वेगाने सुरू आहे. ज्यावेळी लस येईल त्यावेळी या माहितीचा उपयोग होईल असा विश्वास यावेळी राजेश टोपे यांनी व्यक्त केला.
आधी अनुत्तीर्ण नंतर एसटी प्रवर्गातून देशात अव्वल