१०८ महिलांचा समावेश, लष्करी कमांडमध्ये होणार नियुक्ती, २२ जानेवारीला प्रक्रिया होणार पूर्ण
नवी दिल्ली : लष्करात महिलांना समान संधी देण्यासाठी भारतीय लष्कराने लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत असलेल्या १०८ महिला अधिका-यांना कर्नल पदावर पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला आहे. एवढ्या मोठ्या संख्येने महिला अधिका-यांना आर्मी कर्नल पदावर बढती देण्याची प्रक्रिया खूप खास आहे. या महिन्यात कर्नल पदावर पदोन्नती मिळालेल्या सर्व महिला अधिका-यांना लष्कर कमांड असाइनमेंटवर पोस्टिंग ऑर्डर जारी करेल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारी अखेरीस विविध शाखांमध्ये कर्नल पदावर बढती मिळालेल्या महिला अधिका-यांच्या पहिल्या तुकडीच्या पोस्टिंगची अधिसूचनाही लष्कर जारी करेल. ही प्रक्रिया ९ जानेवारीपासून सुरू करण्यात आली असून ती २२ जानेवारीला पूर्ण होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार १९९२ ते २००६ च्या बॅचमधील विविध शस्त्रास्त्रे आणि सेवा अभियंता, सिग्नल, आर्मी एअर डिफेन्स, इंटेलिजन्स कॉर्प्स, आर्मी सर्व्हिस कॉर्प्स, आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स आणि इलेक्ट्रिकल आणि इंजिनिअर्स आणि मेकॅनिकलमध्ये १०८ कर्नल रँक रिक्त आहेत. यासाठी दावा करणा-या एकूण २४४ महिला अधिका-यांपैकी १०८ महिलांना पदोन्नती दिली जाणार आहे.
पदोन्नतीची प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी आणि प्रतिस्पर्धी महिला अधिका-यांच्या शंका दूर करण्यासाठी लष्कराने एकूण ६० महिला अधिका-यांना निवड मंडळासाठी निरीक्षक म्हणून बोलावले आहे. निवड मंडळाची प्रक्रिया २२ जानेवारी रोजी पूर्ण होईल. तेव्हा १०८ महिला अधिका-यांच्या नियुक्तीची प्रक्रिया या महिन्यातच सुरू केली जाणार आहे.
आर्टिलरी कॉर्प्समध्येही
लवकरच समावेश
सैन्यात प्रथमच पाच महिला अधिका-यांनी प्रतिष्ठित डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कोर्स आणि डिफेन्स सर्व्हिसेस टेक्निकल स्टाफ कोर्सच्या परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. या पाच महिला अधिका-यांना एक वर्षाचा कोर्स करावा लागेल आणि भविष्यातील कमांड नियुक्तीसाठी विचार केला जात असताना त्यांना योग्य वेटेज मिळेल. अभियंता, आर्मी एअर डिफेन्स आणि सिग्नलचा भाग म्हणून महिला अधिकारी आधीच आपापल्या क्षेत्रात छाप सोडत आहेत. आर्टिलरी कॉर्प्समध्ये लवकरच महिलांचा समावेश करण्यात येणार आहे.
शांतता मोहिमेत
महिलांचा सहभाग
अलीकडेच सियाचीन ग्लेशियरमधील एका पोस्टवर एका महिला अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या विविध शांतता मोहिमांमध्ये भारतीय महिला सैनिकांच्या भूमिकेत लक्षणीय वाढ झाली आहे.