मुंबई : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने मंगळवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने सावित्रीबाईंचा मुखवटा घालून विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. आपल्या मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी अंगणवाडी सेविका शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्याची भेट घ्यायची आहे. जोपर्यंत एकनाथ शिंदे यांची भेट होत नाही, तोपर्यंत अंगणवाडी सेविका आझाद मैदान सोडणार नाहीत, असा पवित्रा आंदोलक महिलांनी घेतला आहे.
दरम्यान अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनात वाढ, मासिक पेन्शन, अंगणवाड्यांच्या भाडेपट्टीत वाढ, शासकीय कर्मचा-यांचा दर्जा आणि वेतन द्यावे, अर्ध्या पगाराऐवजी दरमहा पेन्शन मिळालीच पाहिजे, नवा कार्यक्षम मोबाईल आणि राजभाषेत पोषण ट्रॅक अॅप द्यावे, बालकांच्या पूरक पोषण आहारामध्ये दुपटीने वाढ करून चांगल्या प्रतीचा आहार द्यावा, या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने आंदोलन पुकारले आहे.
त्यासोबतच, सेवानिवृत्त अंगणवाडी कर्मचा-यांना त्वरित एकरकमी लाभ द्यावा, सुसज्ज अंगणवाडी केंद्र बांधून द्यावे, अंगणवाडी कर्मचा-यांच्या रिक्त जागा भराव्यात, तसेच, मिनी अंगणवाडी आणि अंगणवाडी सेविका यांना समान मानधन आणि समान सेवा शर्ती द्याव्यात, अशा मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे.
जोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटून आंदोलनाची दखल घेत मागण्या पूर्ण करत नाहीत तोपर्यंत आझाद मैदानावर असाच ठिय्या देणार अशी आक्रमक भूमिका आंदोलक सेविकांनी घेतली आहे.
दिवसेंदिवस वाढती महागाईकेंद्र सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये अंगणवाडी कर्मचा-यांसाठी कोणतीही तरतूद करण्यात आली नाही. सध्याच्या काळात बेरोजगारी आणि महागाई प्रचंड वाढली आहे. अंगणवाडी सेविकांना तटपुंज्या मानधनावर काम करावे लागते असे आंदोलकांचे मत आहे.