लातूर : प्रतिनिधी
लॉकडाऊन ४़० मध्ये केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे लातूर जिल्ह्यात अडकलेले परजिल्हा व परराज्यातील अनेक मजूर, कामगार आपल्या मूळ गावी गेलेले आहेत. हे मजूर जिल्ह्याच्या विविध भागांसह महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांतर्गत विविध खाजगी कंपनीत काम करीत होते. त्या सर्व ठिकाणी लातूर जिल्ह्यातील स्थानिक मजुरांना एमआयडीसीने रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोविड-१९ च्या अनुषंगाने आढावा बैठकीत पालकमंत्री अमित देशमुख बोलत होते. या वेळी पर्यावरण, भूकंप पुनर्वसन, रोजगार हमी, सार्वजनिक बांधकाम व पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलिस अधीक्षक राजेंद्र माने, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे, आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ़ अनंत गव्हाणे, प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील, माजी आमदार वैजनाथ शिंदे, अॅड़ व्यंकट बेद्रे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले की, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी यांनी या लॉकडाऊनच्या कालावधीत एमआयडीसीच्या विविध उद्योगांतून किती कामगार परजिल्हा व परराज्यात गेलेले आहेत व विभागनिहाय त्यांच्या किती जागा रिक्त आहेत त्याची माहिती सादर करावी व या रिक्त जागेवर लातूर जिल्ह्यातील स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे त्यांनी निर्देशित केले. उदगीरसह जिल्ह्याच्या व इतर जिल्ह्याच्या कोणत्याही भागातून जर त्या भागातील वैद्यकीय अधिकाºयांनी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात रुग्ण रेफर केला असेल तर रुग्णालय प्रशासनाने त्या रुग्णास दाखल करून त्याच्यावर तात्काळ वैद्यकीय उपचार करणे गरजेचे असल्याचे मत मांडून रुग्णालय प्रशासनाने याची दखल घ्यावी, अशी सूचना पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केली.
Read More बलाढ्य चिनी कंपन्यांना धोका वाढला
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात जिल्ह्यात जवळपास ९० टक्के उद्योग-व्यवसाय सुरू झालेले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली तसेच नागरिकांनी स्वत:हून शारीरिक आंतर पाळण्याबाबत प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आल्याची माहिती दिली तसेच गंजगोलाई बाजारपेठ परिसरातील कोणत्याही ठिकाणी वाहने पार्किंग करण्यास मनाई आदेश दिलेले असून त्या बाबतचा सकारात्मक बदल दिसून येत असल्याची माहिती त्यांनी दिली. त्या प्रमाणेच परजिल्हा व परराज्यातून अनेक लोक आपल्या मूळगावी येत आहेत त्या लोकांना तपासणी नाक्यावरच तपासणी करून होम क्वारंटाईन केले जात आहे; परंतु हे लोक गावी गेल्यानंतर त्या गावातील लोकांकडून मात्र त्यांच्याशी चांगला व्यवहार केला जात नसल्याची माहिती जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिली तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली.
जिल्ह्यात १४ मे २०२० पासून आॅनलाईन पद्धतीने घरपोच मद्यविक्री सुरू असून ग्राहकाची प्रतिदिन मागणी १२ ते १४ हजार लिटर मद्याची असून घरपोच सेवेमार्फत प्रतिदिन ७ ते ८ हजार लिटरचा पुरवठा केला जात असल्याची माहिती उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश बारगजे यांनी दिली तसेच आजपासून एफ एल ३ दुकाने सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रारंभी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ संजय ढगे यांनी जिल्ह्यात आतापर्यंत ९३४ व्यक्तींचे स्वॅब नमुने घेण्यात आले असून त्यातील ६६ व्यक्तींना कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती दिली तसेच सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले रुग्ण २८ असून घरी सोडण्यात आलेले रुग्ण ३६ आहेत तर मृत्यू झालेले रुग्ण संख्या २ असल्याची माहिती त्यांनी दिली. उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये उदगीर येथील रुग्णालयात १७, निलंगा येथील कोव्हिड रुग्णालयात ६ व विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेतील कोव्हिड रुग्णालयात ५ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती डॉ. ढगे यांनी दिली.
माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांचा स्मृतिदिन
भारताचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांचा दि़ २१ मे रोजी स्मृतिदिन असून हा दिवस दहशतवाद व हिंसाचार विरोधीदिन म्हणून पाळला जातो. यानिमित्त गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अमित देशमुख यांनी उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी व अधिका-यांना शपथ दिली.
नागरिकांनी स्वत:हून मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे
प्रशासनाने कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे कार्यवाही करावी. आपल्या जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर उद्योग व्यवसाय सुरू झालेले असून त्या ठिकाणी व बाजारपेठेमध्ये फिजिकल डिस्टिन्स योग्य पद्धतीने पाळले जाते की नाही याची खात्री करावी तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी स्वत:हून प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले.