नवी दिल्ली : सोन्याच्या चहाबद्दल तुम्ही ऐकलंच असेल. हा २४ कॅरेट सोन्याचा चहा खिशाला अगदी खरवडून काढणारा आहे. पण तरीही हौशी लोकांना जर हा चहा घ्यायचा असेल तर त्यासाठी दुबईलाच जावं लागत होतं. पण आता हा चहा भारतातच उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे या चहाला युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांचं नाव देण्यात आलं आहे.
आसामचे चहाचे व्यापारी रणजित बरुआ यांनी हा चहा भारतात आणला आहे. २४ कॅरेट सोन्याच्या या चहाचीकिंमत आहे अडीच लाख रुपये किलो. या चहाचा एक घोट घेताच तुम्हाला या चहाचा एक वेगळाच अनुभव येईल.
काय आहेत या चहाची वैशिष्ट्ये?
स्वर्ण पोनम या सुवर्ण चहामध्ये खाण्यायोग्य २४ कॅरेट सोन्याच्या पातळ पापुर्द्यांचा वापर करण्यात आला आहे. या चहामध्ये वापरण्यात आलेली चहाची पावडरही खास काळ्या चहाच्या पानांपासून बनलेली आहे. हा विशेष चहा आसामचे चहा तज्ज्ञ आणि व्यापारी रणजित बरुआ यांनी तयार केला आहे. त्यांनी युरोपात चहा विकला आणि त्यानंतर त्यांना प्रसिद्धी मिळाली.
आसाममधल्या या दुर्मिळ काळ्या चहामध्ये मध, गूळ आणि कोको पावडर मिसळलेली आहे. चहाच्या कोवळ्या पानांपासून ही पावडर बनवली जाते. शुद्ध स्वरुपातल्या सोन्याचे पापुद्रे असलेला हा भारतातला पहिला चहा आहे. स्वर्ण पोनम ह्या चहाच्या १०० ग्रॅमच्या पुड्याचीकिंमत २५ हजार रुपये आहे. बरुआ यांनी या चहाला युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांचं नाव दिलेलं आहे. रशियाच्या आक्रमणाविरोधात लढताना झेलेन्स्की यांनी दाखवलेल्या शौर्य आणि साहसाचा सन्मान म्हणून हे नाव देण्यात आलेलं आहे.