मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज ६२ वा वाढदिवस. गेल्या दीड-दोन महिन्यांचा काळ म्हणजे त्यांच्यासाठी राजकीय परीक्षेचाच म्हटला पाहिजे. तर त्याच्या राजकीय जडणघडणीत त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांचा मोठा वाटा आहे. रश्मी आणि उध्दव ठाकरे यांचा प्रेमविवाह झाला आहे.
फोटोग्राफीमध्ये आवड असणा-या आणि त्यातच रमणा-या उद्धव ठाकरेंना राजकारणात प्रवेश करण्यासाठी रश्मी ठाकरेंनी आग्रह केला, असे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. आज शिवसेना आणि उध्दव ठाकरे संकटात असताना त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या खंबीरपणे सोबत आहेत.
सर्वसामान्य मराठी कुटुंबातील मुलगी ते ठाकरे कुटुंबाची सून-ते आता मुख्यमंत्र्यांची पत्नी इतकाच काही रश्मी ठाकरेंचा प्रवास किंवा इतकीच काही त्यांची ओळख नाही तर शिवसेनेच्या राजकारणात पडद्यामागून रश्मी ठाकरे सक्रिय असतात याचा प्रत्यय अनेकवेळा आला आहे.
उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्यावेळी शपथविधी सोहळ्याच्या व्यासपीठावर रश्मी ठाकरे यांना हात मिळवतानाचा उद्धव ठाकरेंचा एका फोटो खूप व्हायरल झाला होता.
रश्मी ठाकरे या डोंबिवलीमधल्या एका मिडलक्लास घराण्यातल्या. पाटणकर हे त्यांचे लग्नाआधीचे आडनाव. मुलुंडच्या वझे-केळकर कॉलेजमधून त्यांनी डिग्री घेतली. १९८७ साली एलआयसीमध्ये त्यांनी नोकरी केली. या नोकरी दरम्यान त्यांची ओळख झाली ती जयवंती ठाकरे यांच्याशी. जयवंती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बहीण.
आणि याच बहिणाबाईंच्या माध्यमातून रश्मी आणि उद्धव ठाकरे यांची ओळख झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे राजकारणात नव्हते, जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये ते शिकत होते आणि फोटोग्राफीला ते सर्वाधिक वेळ द्यायचे. त्यांनी एक जाहिरात एजन्सीसुद्धा सुरू केली होती.
पुढे रश्मी आणि उद्धव यांची ओळख मैत्रीत बदलली. त्यानंतर भेटीगाठी वाढल्या. असे म्हणतात उद्धव ठाकरे रश्मी यांना भेटण्यासाठी लोकलने प्रवास करून डोंबिवलीला जायचे. मग काय हीच मैत्री प्रेमात बदलली. आणि पुढे त्यांच्या या नात्याला घरच्यांनीसुद्धा सहमती दिली आणि १३ डिसेंबर १९८८ ला दोघांचे लग्न झाले.
रश्मी ठाकरेंमुळे उद्धव ठाकरे राजकारणात आले
१९८८ मध्ये रश्मी आणि उद्धव ठाकरे यांचे लग्न झाले. लग्नानंतर सहा वर्षांनी महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले. त्यानंतर काही वर्षांनीच उद्धव ठाकरे यांनी राजकारणात प्रवेश केला.
शिवसेनेच्या महिला नेत्यांनी आयोजित केलेल्या बहुतांश कार्यक्रमांना रश्मी ठाकरे हजर राहताना दिसतात. काही ठिकाणी सेनेच्या व्यासपीठांवरून भाषण करतानाही त्या दिसल्या.
२००० सालानंतर त्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत दौ-यावरही जाऊ लागल्या. पतीसोबत म्हणजे उद्धव ठाकरेंसोबत त्या राजकीय कार्यक्रमांमध्ये दिसू लागल्या. हा सर्व काळ शिवसेना विरोधी पक्षात असतानाचा होता. मात्र, पुढे सहा-सात वर्षांनी त्या अधिकच सक्रिय झाल्या. २०१० साली कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक झाली, त्यावेळी रश्मी ठाकरे प्रचारातही उतरल्या होत्या.