पुणे : पुणे पोटनिवडणुकीत मोठ्या प्रमाणात घडामोडी घडताना दिसत आहेत. एकमेकांवर पैसे वाटल्याचा काल दिवसभर आरोप करण्यात आला मात्र रात्री उशिरा पुण्यातील गंज पेठेत पैसे वाटण्यावरून मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले.
कसबा संघातील गंज पेठेत मोठा गोंधळ उडाला. पैसे न घेतल्याने एका महिलेला मारहाण करण्यात आल्याचे समोर आले. रात्री उशिरा या सगळ्या प्रकारामुळे गंज पेठेत मोठा गोंधळ झाला. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंज पेठ परिसरातील भाजपचे माजी नगरसेवक विष्णू आप्पा हरिहर यांचा भाऊ हिरा हरिहर यांनी पैसे न घेतल्याने एका महिलेला मारहाण केली. कालपासून सगळीकडे कार्यकर्ते पैसे वाटत होते. हरिहर यांना डावलल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी राग व्यक्त केला. त्यांनी गंज पेठेत येऊन नागरिकांना शिवीगाळ आणि मारहाण केली. यासंदर्भात काँग्रेसचे माजी आमदार रमेश बागवे यांनी आरोप केले. यासंदर्भात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
नागरिक संतापले…
मारहाण केल्यामुळे अनेक नागरिक मध्यरात्री रस्त्यावर उतरले होते. त्यांनी गोंधळ निर्माण केला. किमान ५० ते ६० नागरिक मध्यरात्री रस्त्यावर उतरलेले दिसले. त्यांनी अनेकांवर आरोप केले. पोलिस कारवाई करत नाहीत. पोलिस दबावाखाली काम करत आहेत, असे आरोप अनेकांनी केले आहेत. यावेळी पोलिसही नागरिकांशी हुज्जत घालताना दिसले. याचे व्हीडीओदेखील व्हायरल झाले आहेत. रात्री हा प्रकार समजल्याने नागरिक संतापले. त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते.