27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रकुपोषणाच्या मृत्यूवरून विधानसभेत राडा

कुपोषणाच्या मृत्यूवरून विधानसभेत राडा

एकमत ऑनलाईन

  चव्हाण, वळसे पाटलांनी गावितांना घेरले;  उत्तर बदला नाहीतर हक्कभंग आणण्याचा इशारा
मुंबई : राज्यात कुपोषणामुळे एकही मृत्यू नाही, असे उत्तर बुधवारी विजयकुमार गावित यांनी दिले होते. यावर तीव्र आक्षेप घेत अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांनी योग्य ती आकडेवारी द्यावी, दिशाभूल करू नये, अशी मागणी केली होती. त्यानंतरही कुपोषणामुळे एकही मृत्यू नाही या दाव्यावर गावित ठाम राहिले.

अध्यक्षांनीही योग्य ती माहिती घेऊन उत्तर देण्याची सूचना केल्यानंतर हा प्रश्न राखीव ठेवण्यात आला, पण दुस-या दिवशीही गावितांनी तेच उत्तर दिले, ज्यावर दिलीप वळसे पाटील संतप्त झाले. अन् त्यांनी आपल्या माजी सहका-याला रोखठोक इशारा दिला. पृथ्वीराज चव्हाण आणि आदित्य ठाकरे यांनीही वळसे पाटलांच्या सुरात सूर मिसळून मंत्री गावितांना खडे बोल सुनावले.

आदिवासी मंत्री विजयकुमार गावित यांनी राज्यात कुपोषणामुळे एकही मृत्यू नाही हेच उत्तर पुन्हा दिले आहे, मला त्यांच्याविरोधात हक्कभंग आणावा लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला अजून काही सुधारित उत्तर द्यायचे असेल तर प्रयत्न करावा, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले. विजयकुमार गावित हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते. २०१३ ला त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. पुढे त्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सध्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांच्यावर आदिवासी मंत्रालयाची धुरा आहे.

दिलीप वळसे पाटलांच्या आक्रमक आणि रोखठोक इशा-यानंतरही आदिवासी मंत्री गावितांचा सूर काही बदलला नाही. माझे उत्तर जशास तसे आहे आणि ते तसेच असेल. कुपोषणामुळे राज्यात मृत्यू झालेले नसून ते विविध आजारांमुळे झाले आहेत, असे गावित म्हणाले.

दिलीप वळसे पाटलांनी थेट हक्कभंग आणण्याचा इशारा दिल्यानंतरही गावितांचे उत्तर बदलले नाही, जे काही आकडे तुम्ही सांगताय ते कुपोषणामुळे नव्हे तर रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे मृत्यू झाले आहेत, असे अजब उत्तर आदिवासी मंत्र्यांनी दिले. या निमित्ताने नवसंजीवनी योजनेचा कसा बोजवारा उडाला आहे, मंत्र्यांकडेही त्याची कशी माहिती नाही हे पुन्हा एकदा समोर आले. विजयकुमार गावित हे आधी राष्ट्रवादीतच होते, त्यांच्या जुन्या सहका-यांनीच या प्रसंगी चौफेर घेरले.

पृथ्वीबाबांनी वळसे पाटलांच्या सुरात सूर मिसळला…!
मंत्र्यांचे हे अत्यंत असंवेदनशील उत्तर आहे, आदिवासी समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. पुन्हा माहिती घेण्याची संधी दिली होती, तरी त्यांनी नीट माहिती घेतलेली नाही. राज्यात एकही मृत्यू होत नाही असे सरकारला वाटते आणि ते अत्यंत अशास्त्रीय आहे. मंत्री म्हणतात कमी वजनामुळे मृत्यू झाले, पण वजन कमी कशामुळे होते? कुपोषणामुळेच वजन कमी होते आणि त्यामुळेच मृत्यू होतात. बालमृत्यू का होतात या प्रश्नाकडे त्यांना वळायचेच नाही, असे म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनीही मंत्री गावितांना घेरत त्यांना खडे बोल सुनावले.

आदिवासी भागातली परिस्थिती कशी असते याची आपल्याला लाज वाटायला हवी, राखीव उत्तर होऊनही तेच तेच उत्तर दिले जात आहे, असे म्हणत आदित्य ठाकरेही संतापले. आदिवासी मंत्र्यांच्या त्याच त्याच उत्तराने राष्ट्रवादीच्या नेत्यांसह आदित्य ठाकरेही संतापलेले पाहायला मिळाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या