मुंबई : छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या आदल्या रात्री समाजकंटकांनी दगडफेकीसह पोलिसांवर पेट्रोलने भरलेल्या बाटल्या फेकल्याची घटना घडली.
त्याप्रकरणी काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हे प्रकरण ताजे असतानाच मुंबईत रामनवमीला दोन गटांत राडा झाला. या प्रकरणी २० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरवर्षीप्रमाणे रामनवमीला मुंबईतील मालाड परिसरात हिंदू संघटनांकडून शोभायात्रा काढण्यात आली. ही मिरवणूक मालवणी परिसरातून जात असताना दोन गटांत हाणामारी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी २० जणांना ताब्यात घेतले. काही काळ परिस्थिती तणावपूर्ण होती पण आता नियंत्रणात आहे. परिसरातील वातावरण धोक्यात आणल्याप्रकरणी ३०० हून अधिक अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या घटनेत एक जण किरकोळ जखमी झाला. कायदेशीर कारवाई सुरू असून पुढील तपास सुरू आहे. अशी माहितीही पोलिसांनी दिली. रामनवमी निमित्ताने मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात बजरंग दलाकडून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. याच शोभायात्रेत मालवणी गेट क्रमांक पाचजवळ दोन गटांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
शोभायात्रेदरम्यान काही लोकांकडून दगडफेक आणि चप्पलफेक करण्यात आली, असा आरोप भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांनी केला आहे. सध्या मालवणी परिसरात तणावाचे वातावरण असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांकडून बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.