भोपाळ : धार्मिक कट्टरतावाद पसरवणा-या हिज्ब-उत-तहरीर या संघटनेच्या १६ सदस्यांना भोपाळ, छिंदवाडा आणि हैदराबादमधून अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास पथकाने अर्थात एनआयएने या ठिकाणांवर अचानक केलेल्या छापेमारीनंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईनंतर प्राथमिक चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.
एनआयएने आणि तेलंगणाच्या एटीएसने ही कारवाई केली होती. या टीमने भोपाळमध्ये छापेमारी करत या कट्टरवाद्यांना जेव्हा अटक केली, त्याची खबर भोपाळ पोलिसांनाही नव्हती. इतक्या गुप्तपणे ही कारवाई करण्यात आली. यामध्ये आतापर्यंत एकूण १६ जणांना अटक करण्यात आली. त्यात भोपाळमधून १०, हैदराबादमधून ५ तर छिंदवाडा इथून एका जणाला ताब्यात घेण्यात आले. याद्वारे धार्मिक कट्टरता पसरवणारे हे मोड्युलच उद्ध्वस्त करण्यात आलं आहे. याची चौकशी मध्य प्रदेश एटीएस आणि आयबीकडून करण्यात येत होती. पण हे प्रकरण आंतरराज्यीय असून याचे कनेक्शन आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे. त्यामुळे आता याचा तपास एनआयएने सुरू केला आहे. अटक करण्यात आलेल्या लोकांचा पाकिस्तानातील एका फोन नंबरशी सतत संपर्क असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
एनआयएने या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. त्यानुसार कट्टरवादी विचार पसरवण्यासाठी हे लोक हिज्ब-उत-तहरीर या संघटनेचे केडर निर्माण करण्याच्या प्रयत्नात होते. त्यासाठी ते आपली ओळख लपवून वावरत होते. त्यासाठी एखाद्या गुप्तहेराप्रमाणे ते जीम ट्रेनर, कॉम्प्युटर टेक्निशिन, टेलर आणि रिक्षा ड्रायव्हर बनून वावरत होते. यातील सर्वात मोठा खुलासा म्हणजे कट्टरतावाद पसरवणारे हे लोक संवादासाठी डार्क वेब अॅप रॉकेट चॅट आणि थ्रिमासारख्या अॅप्सचा वापर करत होते. यामुळे ते नक्की कुठल्या ठिकाणावरुन संवाद साधत आहेत हे तपास यंत्रणांना कळू शकत नाही.