27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर; सर्वांत तरुण विधानसभा अध्यक्ष

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर; सर्वांत तरुण विधानसभा अध्यक्ष

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी अखेर राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. विधानसभेत मोठ्या गदारोळात मतदान पार पडले. भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी मैदानात होते. या लढतीत नार्वेकर यांनी बाजी मारली. ते राज्याच्या इतिहासातील सर्वांत तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत.

शिरगणती केल्यानंतर नार्वेकर यांना बहुमतापेक्षा जास्त १६४ मते मिळाली. तर राजन साळवी यांना १०७ मते मिळाली. समाजवादी पक्ष आणि एआयएमचे आमदार या मतदानात तटस्थ राहिले. एकूण तीन आमदार तटस्थ राहिले. अशा पद्धतीने नार्वेकर मोठ्या मतांनी विजयी झाले. आता अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. कारण उद्या शिंदे-फडणवीस सरकारची बहुमत चाचणी देखील पार पडणार आहे.

राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड करावी असा प्रस्ताव चंद्रकांत पाटील यांनी मांडला. त्याला गिरीश महाजन यांनी अनुमोदन दिले. तर चेतन तुपे यांनी साळवी यांचा प्रस्ताव मांडला, संग्राम थोपटे यांनी अनुमोदन दिले. नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे.

विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अध्यक्षांची निवड झाली आहे. शिंदे सरकारकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते तर महाविकास आघाडीकडून शेवटच्या क्षणाला राजन साळवी यांना मैदानात उतरवले होते. एकनाथ शिंदे गट आणि भाजपचे संख्याबळ पाहता राहुल नार्वेकर हेच विधानसभा अध्यक्ष होतील हे जवळपास निश्चित होते.

विधानमंडळावर सासरे आणि जावयांचे ‘राज्य’
राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याने विधानमंडळावर सासरे आणि जावयांचे ‘राज्य’ असणार आहे. विधानसभेत जावई राहुल नार्वेकर तर विधान परिषदेत त्यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर हे सध्या विधान परिषदेचे सभापती आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती म्हणून जावई आणि सासरे अशी जोडी पाहायला मिळाली आहे.

राहुल नार्वेकर हे ४५ वर्षांचे आहेत. ते विधानसभेचे आजवरचे सर्वांत तरुण अध्यक्ष ठरले आहेत. राहुल नार्वेकर हे एकेकाळचे शिवसेनेचे खंदे नेते होते. त्यानंतर ते राष्ट्रवादीकडून विधान परिषदेत होते. आता ते भाजपाचे आमदार आहेत. राहुल नार्वेकर यांना भाजपाने विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर करत आणखी एक मास्टरस्ट्रोक खेळला आहे. राहुल नार्वेकर हे मुंबईतील कुलाबा मतदारसंघाचे आमदार आहेत.

शिवसेनेतून राजकीय प्रवासाला सुरुवात
तीन वर्षे राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य
२०१९ च्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश
२०१९ साली कुलाबा मतदारसंघातून आमदार
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकरांचे जावई

बहुमत चाचणीवेळी अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची
विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवाराची घोषणा झालेली नव्हती. शेवटी तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी चर्चा करून साळवींच्या नावावर शिक्कामोर्तब केल्े. नवनियुक्त शिंदे सरकारची बहुमत चाचणी दोन दिवसांच्या अधिवेशनात होणार आहे. त्याआधी विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांनी बाजी मारली आहे. शिंदे गट आणि भाजपच्या बहुमत चाचणीवेळी अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या