16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, पिके पाण्यात

राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, पिके पाण्यात

एकमत ऑनलाईन

मराठवाड्याला मोठी झळ, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातही धिंगाणा 

मुंबई/औरंगाबाद : परतीच्या वाटेवरील मोसमी पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. मराठवाड्यातही पावसाचा जोर कायम असल्याने काढणीला आलेली पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे सोयाबीन, कापसासह सर्वच खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. परतीच्या पावसाने हातातोंडाला आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत पिकांमध्ये पाणी थांबल्याने सोयाबीन, कापूस नासून जात आहे.

मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, बीड, हिंगोली, परभणी, नांदेडसह उस्मानाबाद, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. सरसकट नसला, तरी बहुतांश भागात पावसाचा जोर कायम असल्याने सर्वत्र पिके पाण्यात गेली आहेत. त्यामुळे खरीप पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. सोयाबीन सध्या काढणीला आले आहे. तसेच कापूसदेखील वेचणीला आलेला आहे. परंतु पावसाचा धडाका कायम सुरू असल्याने जागेवरच पिके नासू लागल्याने शेतकरी धास्तावला आहे. परतीचा पाऊस रोजच सुरू आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, महाबळेश्वरसह पुणे, मुंबई परिसरातही पावसाचा जोर कायम आहे. कोकणातही परतीचा पाऊस ठाण मांडून बसला आहे. कोकण आणि मुंबई परिसरात सर्वत्र पावसाचा धिंगाणा सुरू आहे. मुसळधार पावसाने राज्यातील अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. यासोबतच विदर्भातदेखील पावसाचा जोर कायम आहे. यामुळे शेतक-यांचे फार मोठे नुकसान झाले आहे.

राज्यातील काही भागात या आधीच अतिवृष्टी तर मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या आठवड्यात कोकणसह मुंबईला हवामान खात्याने ऑरेज अलर्ट दिला होता. आता कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गासह पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, पुणे आणि कोल्हापूर, तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि नगर जिह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. आज उत्तर महाराष्ट्र वगळता संपूर्ण कोकणसह, पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाने झोडपले आहे.
मराठवाड्यासह ब-याच
भागात यलो अलर्ट
उत्तर महाराष्ट्र वगळता संपूर्ण कोकणसह, पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे मराठवाड्यासह कोकण, विदर्भात आणखी मोठ्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मराठवाड्यात मोठी हानी
मराठवाड्यातील बहुतांश भागाला यंदा सुरुवातीपासूनच अनावृष्टी, अतिवृष्टी, पूर यासारख्या संकटाचा सामना करावा लागला. या संकटाचा सामना करीत कसे तरी खरीप पिके तगली होती. मात्र, आता ऐन काढणीच्या वेळी परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरू असल्याने खरीप हंगाम हातातून जाण्याचा धोका वाढला असून, यामुळे शेतक-यांचे फार मोठे नुकसान होणार आहे.

बीडमध्ये ६ मंडळात अतिवृष्टी
बीड जिल्ह्यात तीन दिवसांपासून पडणा-या मुसळधार पावसाने ६ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे कापूस आणि सोयाबीनचे पीक वाया गेले आहे. यावर्षी बीड जिल्ह्यात सोयाबीन आणि कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे जास्त उत्पन्नाची अपेक्षा होती. मात्र परतीच्या पावसाने मोठी हानी झाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या