पुणे – राज्यात मॉन्सूनच्या पावसाची कोकणात जोरदार बॅटिंग सुरू आहे. सोमवारी (ता. २७) कोणात जोरदार तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
रविवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. रत्नागिरीतील लांजा येथे सर्वाधिक २७५ मिलिमीटर, तर रत्नागिरी येथे २२२ पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली.
राज्यात मागील आठवड्यात सुरवातीला ब-याच ठिकाणी कमी अधिक पावसाने हजेरी लावली. त्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला.
सध्या ऊन-सावली आणि पावसाच्या हलक्या सरी असे चित्र राज्यातील काही भागात पाहायला मिळत आहे. मात्र, कोकणात पावसाचा जोर वाढला आहे.
दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टी दरम्यान असलेल्या समांतर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. तर पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार, कोकणात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टी भागात सोसाट्याचे वारे तर राज्यातील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेची शक्यता आहे.
मॉन्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापून आता दहा दिवसांचा कालावधी उलटला आहे. पण अद्याप राज्याच्या काही ठिकाणी पावसाने समाधानकारक हजेरी लावलेली नाही. यामध्ये प्रामुख्याने घाटमाथा आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रांचा समावेश आहे. राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.
हंगामातील स्थिती पाहता १ ते २६ जून या कालावधित राज्यात सरासरीपेक्षा सुमारे ३५ टक्के कमी पाऊस पडला आहे. साधारणपणे या कालावधीत सरासरी १७०.८ मिलिमीटर इतका पाऊस पडतो. परंतु यंदा ११२.९ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जोरदार पावसासाठी अजून प्रतिक्षा आहे.
मॉन्सूनच्या वाटचाल गेल्या काही दिवसांपासून थांबली होती. मात्र आता मॉन्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक होत आहे. त्यामुळे मॉन्सून येत्या तीन ते चार दिवसांत संपूर्ण मध्य प्रदेश, बिहार, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश आदी भागात प्रगती करण्याची शक्यता आहे.
येथे जोरदार पावसाची शक्यता
रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा, कोल्हापूर, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, ंिहगोली, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.