22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रराज ठाकरे यांच्या विदर्भ दौ-याला सुरुवात

राज ठाकरे यांच्या विदर्भ दौ-याला सुरुवात

एकमत ऑनलाईन

नागपूर : गेल्या चार महिन्यांत घेतलेल्या सभा, ठाकरे सरकारवर ओढलेले आसूड, भाजपला अनुकूल घेतलेली भूमिका, ज्वलंत हिंदुत्वाचा मुद्दा तसेच शिवसेनेत पडलेली फूट, एकनाथ शिंदे यांचे बंड आणि मोठ्या नाट्यानंतर शिंदे-फडणवीसांचे विराजमान झालेले सरकार, दरम्यान या काळात आजारपणावर केलेली मात, अशा सगळ्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विदर्भ दौ-याला आजपासून सुरुवात झाली आहे. आज सकाळी साडेआठ वाजता राज ठाकरे यांचे नागपूरमध्ये आगमन झाले.

यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिका-यांमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता. राज ठाकरेंच्या स्वागताला नागपूर रेल्वे स्टेशनला शेकडो पदाधिका-यांनी गर्दी केली होती. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांचे स्वागत केले गेले. राज ठाकरेंनीही शेकडो कार्यकर्त्यांना अभिवादन करून त्यांचा मानपान स्वीकारला.

आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संघटनात्मक बांधणीसाठी राज ठाकरे सुमारे तीन वर्षांनंतर नागपूरला पोहोचले आहेत. मुंबईतून काल विदर्भ एक्स्प्रेसने निघालेले राज ठाकरे आज साडेआठ वाजेच्या सुमारास नागपुरात पोहोचले. मनसे कार्यकर्त्यांनी थाटामाटात राज ठाकरे यांचे स्वागत केले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. राज ठाकरेंना गर्दीतून वाट काढत रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडावे लागले. यावेळी पोलिसांचीही चांगलीच तारांबळ उडाली होती.

राज ठाकरे स्टेशनहून थेट हॉटेलवर पोहोचले. चहापान आवरून त्यांनी विदर्भातल्या पहिल्या बैठकीचा श्रीगणेशा केला. आपल्याजवळ तीन महिन्यांचा कालावधी आहे. कामात मागे पडू नका, जोरदार काम करा, अशा सूचना त्यांनी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे कार्यकर्त्यांना आणि पदाधिका-यांना दिल्या. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आपल्याजवळ जे काही शिल्लक दिवस आहेत, त्या दिवसांत प्रचंड काम करा. घराघरांत पोहोचा. पक्षाची ध्येयधोरणे लोकांमध्ये पोहोचवा, आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होईल, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी पदाधिका-यांना मार्गदर्शन केले.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या