राष्ट्रवादीकडून विधान परिषेदत राजु शेट्टी यांची वर्णी लागणार

  340

  बारामती: राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून विधान परिषदेवर जाण्याचा प्रस्ताव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी स्वीकारला आहे. शेट्टी यांनी आज बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत शेट्टी यांनी राष्ट्रवादीकडून विधान परिषेदत प्रतिनिधित्व करण्यास होकार दिला.

  शरद पवार यांच्या खास आग्रहावरून राजू शेट्टी आज बारामतीत दाखल झाले. बारामतीतील शरद पवार यांच्या गोविंद बाग या निवासस्थानी शेट्टी यांनी पवारांची भेट घेतली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. तर शेट्टी यांच्यासोबत संघटनेचे स्थानिक नेते सतीश काकडे तसेच, राजेंद्र ढवाणही होते.

  अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात शेट्टी व पवार यांच्यात चर्चा झाली. या चर्चेनंतर खास फोटोसेशनही झालं. या चर्चेत शेट्टी यांनी राष्ट्रवादीकडून आलेला आमदारकीचा प्रस्ताव मान्य केल्याचे स्वाभिमानी संघटनेतूनच सांगण्यात आले.
  दरम्यान, राष्ट्रवादीच्या कोट्यातून राजू शेट्टी यांनी राज्यपालनियुक्त आमदार व्हावे, असा अधिकृत प्रस्ताव राष्ट्रवादीने शेट्टी यांना दिला होता.

  शरद पवार यांच्या सूचनेनुसार हा प्रस्ताव देण्यात आला होता. पवार यांच्या सांगण्यावरून खुद्द प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हा प्रस्ताव घेऊन राजू शेट्टी यांच्या घरी गेले होते. मात्र शेट्टी यांनी लगेचच कोणताही निर्णय घेतला नव्हता. या प्रस्तावाबाबत स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते व राज्य व्यवहार समिती निर्णय घेईल, असे शेट्टी यांनी पाटील यांना सांगितले होते.

  Read More  पर्रीकरनंतर भाजप आमच्यासाठी संपले