नवी दिल्ली : संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान राज्यसभेचे कामकाज मंगळवारी (१९ सप्टेंबर) दुपारी २ वाजून १५ मिनटापर्यंत तहकूब करण्यात आले आहे. तर लोकसभेचे कामकाज उद्या दुपारी १ वाजून १५ मिनटापर्यंत तहकूब करण्यात आले आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभेचे कामकाज उद्यापासून नवीन संसद भवनात होणार आहे.
केंद्रीय मंत्री पियुष गोयल लोकसभेत म्हणाले की, सभागृहात जेव्हा एवढी अर्थपूर्ण चर्चा सुरू आहे, पंतप्रधान मोदींनी आज महत्वपूर्ण विषय ठेवला आणि त्याला नव्या उंचीवर नेले. तेव्हा क्षुल्लक राजकारण करणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. काही सन्माननीय सदस्य या चर्चेचा दर्जा खालावत आहेत आणि अत्यंत वाईट पद्धतीने या सभागृहाच्या प्रतिष्ठेला धक्का लावत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.
महिला आरक्षण विधेयक
काँग्रेस कार्यकारिणीने महिला आरक्षण विधेयक संसदेच्या विशेष अधिवेशनात मंजूर करावे, अशी मागणी केली आहे. हैदराबादमध्ये दोन दिवसीय बैठकीच्या पहिल्या दिवशी काँग्रेस कार्यकारिणीने आपल्या प्रस्तावात विशेष अधिवेशनात हे विधेयक मंजूर करण्याचा उल्लेख केला आहे.