लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली असून या निवडणुकीतील प्रक्रियेचा कालावधी संपल्यानंतर गुरुवारी नवनिर्वाचित आमदार रमेश कराड यांनी त्यांचे राजकीय दैवत लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
रमेश कराड आमदार झाल्याने लातूर जिल्हाभरातील भाजपाच्या कार्यकर्त्यांत मोठे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपाचे लातूर जिल्हाध्यक्ष रमेश कराड यांच्यासह एकूण ९ उमेदवार विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले आहेत. या सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोमवार, दि़ १८ मे रोजी विधान परिषदेत सभापती यांच्या प्रमुख उपस्थित पार पडणार आहे. स्व़ गोपीनाथराव मुंडे यांचे एकनिष्ठ म्हणून सर्वदूर परिचित असलेल्या रमेश कराड यांना आजपर्यंत केलेल्या कामाची पावती पक्ष नेतृत्वाने दिली. विधान परिषदेच्या निवडणुकीतील प्रक्रियेचा कालावधी संपल्यानंतर गुरुवार, दि़ १४ मे रोजी या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर भाजपाचे लातूर जिल्हाध्यक्ष नवनिर्वाचित आमदार रमेश कराड यांनी त्यांचे राजकीय दैवत लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.
Read More आफ्रिदीकडून मंदिरात अन्नधान्य वाटप
या वेळी माजी आमदार पाशा पटेल, प्रदीप पाटील खंडापूरकर, अनिल भिसे, डॉ. बाबासाहेब घुले, साहेबराव मुळे, अॅड. दशरश सरवदे, रमेश सोनवणे, अनंत चव्हाण, भागवत सोट यांच्यासह इतर अनेक जण उपस्थित होते. भाजपाचे नेते रमेशअप्पा कराड यांनी गुरुवारी सकाळी जन्मभूमी असलेल्या लातूर तालुक्यातील रामेश्वर येथील ग्रामदैवत प्रभू श्रीराम मंदिर, संत गोपाळबुवा महाराज मंदिर, भगवान गौतम बुद्ध विहार, देवीच्या मंदिरासह, खाजा जैनोद्दिन चिस्ती दर्गाह या देव देवतांचे दर्शन घेऊन पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड यांच्या समाधीवर नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले.