कोलंबो : यूनायटेड नॅशनल पार्टीचे (यूएनपी) नेते रानिल विक्रमसिंघे आर्थिक व राजकीय संकटातून मार्गक्रमण करणा-या श्रीलंकेचे नवे पंतप्रधान बनले. त्यांनी गुरुवारी सायंकाळी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. त्यांच्या पक्षाने याची पुष्टी केली आहे. त्यांनी यापूर्वीही पंतप्रधानपद सांभाळले आहे. २०१९ साली रानिल यांनी स्वत:च्याच पक्षाच्या दबावामुळे पंतप्रधान पद सोडले होते. रानिल विक्रमसिंघे १९९४ पासून यूनायटेड नॅशनल पार्टीचे प्रमुख आहेत. त्यांनी आतापर्यंत ४ वेळा श्रीलंकेचे पंतप्रधानपद सांभाळले आहे. ७३ वर्षीय रानिल यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आहे. ७० च्या दशकात त्यांनी राजकारणात प्रवेश केला.