मुंबई : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर हा लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचा नुकताच तु झुठी मैं मक्कार या चित्रपटात दिसला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा समिश्र प्रतिसाद मिळाला. त्याने यावर्षी स्पष्ट केले की, तो गेल्या ११ वर्षांपासून किशोर कुमार यांच्या बायोपिकवर काम करत आहे. मात्र हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे सांगू शकत नाही.
रणबीर कपूरने अद्याप हा बायोपिक करण्यास नकार दिलेला नाही. मात्र आता बॉलिवूडच्या कॉरिडॉरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्यानुसार या सिनेमातून रणबीरचा पत्ता कट झाल्याचे सांगण्यात येत आहे. किशोर कुमारच्या बायोपिकमध्ये आता रणबीर कपुर नसून रणवीर सिंग असेल. त्यामुळे अनेक नवीन चर्चांना उधाण आले आहे. खरं तर, नुकतेच रणबीरने असे विधान केले आहे की त्याला चित्रपटांमधून ब्रेक घ्यायचा आहे आणि त्याच्या आयुष्यासाठी थोडा वेळ काढायचा आहे. त्याला त्याच्या आगामी ऍनिमल चित्रपटानंतर ब्रेक घ्यायचा आहे. रणबीर कपूर म्हणाला की त्याला स्वत:साठी वेळ द्यायचा आहे आणि महामारीनंतर तो आज कुठे उभा आहे आणि इंडस्ट्रीत किती बदलली आहे हे समजून घ्यायचे आहे.
रणबीर कपूरच्या या वक्तव्यानंतर किशोर कुमारच्या बायोपिकचे निर्माते कलाकारांमध्ये बदल करण्याच्या विचारात असल्याच्या चर्चा आहे. ज्यामुळे असा अंदाज लावण्यात येत आहे की रणबीर या चित्रपटात दिसणार नाही, तर त्याजागी रणवीर सिंग दिसेल. परंतु आतापर्यंत याची पुष्टी करण्यात आलेली नाही.