मुंबई : खासदार संजय राऊत यांनी राज्यात विधिमंडळ नाही, तर चोरमंडळ आहे असे वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे. यानंतर आता काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी राज्याच्या जनतेचा अपमान करण्याचा हक्क कोणालाही नसल्याची तसेच संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.
नाना पटोले म्हणाले की, गॅस दरवाढ, पंपाचे कनेक्शन कापणे, महागाई यावरून विरोधकांकडून हल्ला होणार आणि त्याचे उत्तर द्यावे लागेल म्हणून आजचा दिवस कसा मोडून काढता येईल यासाठी भाजपने ही रणनीती केली होती.
संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. त्याचे समर्थन करण्याचे काही कारण नाही. विधिमंडळाचाच नाही तर राज्याच्या जनतेचा अवमान करण्याचा अधिकार कोणालाच नाही, असेही काँग्रेसचे नेते नाना पटोले म्हणाले आहेत.
अध्यक्षांनी निर्णय घेऊन कारवाई करण्याचा अधिकार होता. भाजपच्या सदस्यांकडून हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात आला होता. त्यावर तातडीने निर्णय घ्यायला हवा होता. सभागृहात त्याला कोणाचा विरोध नव्हता.
पण दिवसभर सभागृहाचे कामकाज ज्याप्रक्रारे तहकूब केले हा जनतेच्या घामाच्या पैशाच्या उधळपट्टीचा प्रयत्न झाला आहे, असेही नाना पटोले म्हणाले. अध्यक्षांना अधिकार आहे त्यांनी निर्णय द्यावा पण जनतेचे प्रश्नही महत्त्वाचे आहेत त्यासाठी सभागृह चालू करावे असेही नाना पटोले म्हणाले.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर सभागृहात भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल करण्याचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला. या मुद्यावरून आज चार वेळा विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.