जिल्ह्यात एकच खळबळ : मुंबईहून आलेले सहा जणांचे कुटुंब बाधित
25 एप्रिलला वाशिम जिल्हा कोरोनामुक्त झाला होता
वाशिम : वाशिम जिल्ह्यात ‘कोरोना’चा पुन्हा शिरकाव झाला आहे. वाशिम जिल्ह्यात मुंबईहून आलेल्या 35 वर्षीय महिलेनंतर तिच्या कुटुंबातील आणखी पाच जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.
वाशिमला मुंबईहून सात जण आले होते. त्यापैकी 35 वर्षीय महिलेने प्रकृती बिघडल्याने मुंबईत असतानाच खासगी लॅबमध्ये ‘कोरोना’ची टेस्ट केली होती. त्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तेव्हा वाशिमला पोहोचलेली महिला कुटुंबासह 16 मे रोजी पहाटे थेट जिल्हा रुग्णालयात दाखल झाली.
Read More कोरोनाग्रस्त आढळल्यास आता इमारत सील केली जाणार नाही!
महिलेसह तिच्या कुटुंबातील सात जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्या महिलेच्या संपर्कात असलेल्या हाय रिस्कमधील पाच जणांचे थ्रोट स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. महिलेच्या मुलाचा रिपोर्ट येणं बाकी आहे.
वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 3 कोरोनाबाधित रुग्ण होते. त्यातील दोघे जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला आहे. 25 एप्रिलला वाशिम जिल्हा कोरोनामुक्त झाला होता, मात्र रुग्णसंख्या सहाने वाढल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.