ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल स्टार्क यांची मागणी

नवी दिल्ली : कोरोनामुळे ठप्प पडलेले क्रिकेट पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी आयसीसीने पहिले पाऊल टाकत नियमावली जाहीर केली आहे. वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० विश्वचषक सध्याच्या परिस्थितीत रद्द होण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र भारताविरुद्धची कसोटी मालिका रद्द झाल्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियासमोरचे
संकट अधिक गडद होणार आहे. याचसाठी बीसीसीआयनेही ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळण्याची तयारी दाखवली आहे, मात्र त्यासाठी भारतीय संघ दोन आठवडे ऑस्ट्रेलियात स्वत:ला क्वारंटाईन करेल अशी मागणी बीसीसीआयने केली आहे. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल स्टार्कने ही मालिका गुलाबी चेंडूवर खेळवण्याची मागणी केली आहे.
‘‘भारताविरुद्ध मालिकेत गुलाबी चेंडूवर कसोटी सामना खेळण्यास खरंच मजा येईल. चाहत्यांनाही हा सामना पहायला आवडेल. गुलाबी चेंडूवर गोलंदाज आणि फलंदाजांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं द्वंद्व रंगतं. भारताने याआधी घरच्या मैदानावर गुलाबी चेंडूवर एक सामना खेळला आहे, त्यामुळे ते परिस्थितीशी पूर्णपणे अनभिज्ञ आहेत अशातला भाग नाही. मात्र आकडेवारी तपासली तर गुलाबी चेंडूवर आमच्या संघाने घरच्या मैदानावर अधिक चांगली कामगिरी केली आहे.’’
Read More गॅल्वान व्हॅली आमचाच भाग, भारताने दूर राहावे
गुलाबी चेंडूवर सामना खेळण्यास बीसीसीआयचा नकार होता
काही वर्षांपूर्वी गुलाबी चेंडूवर सामना खेळण्यास बीसीसीआयचा नकार होता. मात्र सौरव गांगुलीकडे बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे आल्यानंतर, भारताने कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर बांगलादेशविरुद्ध पहिला गुलाबी चेंडूवर कसोटी सामना खेळला. या सामन्यात भारताने बाजी मारली होती, यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबत झालेल्या चर्चेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत ४ कसोटी सामन्यांपैकी १ सामना गुलाबी चेंडूवर खेळण्यास बीसीसीआयने होकार कळवला होता. त्यामुळे भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौ-याबद्दल येत्या काही दिवसांत काय निर्णय घेतला जातोय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.