18.6 C
Latur
Thursday, February 2, 2023
Homeउद्योगजगतसाखरेच्या उत्पादनात विक्रमी वाढ

साखरेच्या उत्पादनात विक्रमी वाढ

एकमत ऑनलाईन

मुंबई : वृत्तसंस्था
सध्या देशात ऊसाचा गळीत हंगाम सुरु आहे. देशात साखरेच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. या तिमाहीत (ऑक्टोबर ते डिसेंबर) देशातील साखरेचे उत्पादन १२० लाख टनांवर गेले आहे. यावरुन देशातील साखरेच्या उत्पादनात मोठी वाढ झाल्याचे समजते. देशातील विविध राज्यात साखरेचे बंपर उत्पादन झाले आहे. त्यामुळे सध्या साखरेचा विक्रमी साठा झाला आहे.

विविध पिकांच्या उत्पादनात भारताचा जगातील अव्वल देशांमध्ये वरचा क्रमांक लागतो. सध्या देशात साखरेचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असल्याचे चित्र आहे. चालू ऊस गाळप हंगामाच्या तिमाहीत म्हणजेच ऑक्टोबर-डिसेंबरची आकडेवारी समोर आली आहे. या तिमाहीमध्ये साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. देशातील साखरेचे उत्पादन ३.६९ टक्क्यांनी वाढून १२०.७ लाख टन झाले आहे. इंडियन शुगर मिल असोसिएशन अर्थात इस्माने याबाबतची माहिती दिली आहे. भारत हा साखर उत्पादन करणारा जगातील आघाडीवरचा देश आहे. गेल्या वर्षी याच हंगामात ११६.४ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. त्यात यंदा वाढ झाली आहे. साखर कारखानदारांची संख्याही वाढली आहे. गेल्या वर्षी ५०० साखर कारखान्यांनी ऊसाचे गाळप केले होते. तर यंदा ते ५०९ साखर कारखान्यांकडून ऊसाचं गाळप सुरु आहे.

महाराष्ट्रातील साखर उत्पादनाची स्थिती काय?
इस्माने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील साखर उत्पादन २०२२-२३ च्या ऑक्टोबर-डिसेंबर या कालावधीत ४५.८ लाख टनांवरून ४६.८ लाख टनांपर्यंत वाढले आहे. उत्तर प्रदेशातील साखरेचे उत्पादन ३०.०९ लाख टनांवर पोहोचले आहे. कर्नाटकातील साखरेचे उत्पादन २६.०१ लाख टनांच्या तुलनेत २६.२७ लाख टनांवर गेले आहे. गुजरातमध्ये ३.८ लाख टन, तामिळनाडूमध्ये २.६ लाख टन आणि इतर राज्यांमध्ये ९.९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. दरम्यान साखरेच्या उत्पादनाची ही आतापर्यंतची आकडेवारी आहे. आणखी यामध्ये वाढ होणार आहे. कारण सध्या ऊसाचा गळीत हंगाम सुरु आहे. पुढचे दोन ते तीन महिने ऊसाचा गळीत हंगाम सुरु राहणार आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ होणे अपेक्षीत आहे.

३६५ लाख टन उत्पादनाचा अंदाज
गेल्या वर्षात म्हणजे २०२१-२२ च्या तुलनेत २०२२-२३ मध्ये साखरेचे उत्पादन वाढण्याचा अंदाज इस्माने वर्तवला आहे. २०२१-२२ मध्ये साखरेचे उत्पादन हे ३५८ लाख टन झाले होते. आता हे उत्पादन २०२२-२३ मध्ये ३६५ लाख टनांपर्यंत वाढण्याचा अंदाज इस्माने व्यक्त केला आहे. साखरेच्या चांगल्या उत्पादनाची स्थिती पाहता केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात साखरेची निर्यात करेल असा अंदाज आहे. निर्यातीचा कोटाही निश्चित केला जाईल. २०२१-२२ मध्ये भारताने विक्रमी १११ लाख टन साखर निर्यात केली होती.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या