मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी २५ फूट ८ इंचावर पोहोचली आहे. राजाराम बंधाराही पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाकडून बंधा-यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण १५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून धोकादायक मार्गावरून वाहतूक करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्याला देण्यात आलेला मुसळधार पावसाचा इशारा, तसेच पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत होत असलेली झपाट्याने वाढ यामुळे पुण्याहून कोल्हापूर एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. यामध्ये एका तुकडीत २५ जवान असे ५० जवान कोल्हापूर जिल्ह्यात पोहचले आहेत. एनडीआरएफची एक तुकडी शहरी भागात तर दुसरी ग्रामीण भागात तैनात करण्यात आली आहे.
८ जुलैपर्यंत रेड अॅलर्ट
दुसरीकडे पावसाचा जोर कायम असल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आठ जुलैपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अमरावतीत पिंगळाई नदीला पूर
विदर्भातही पावसाचा जोर वाढला आहे. अमरावतीत मुसधार पावसामुळे पिंगळाई नदीला पूर आला आहे. सात ते आठ जण पुराच्या पाण्यात अडकले आहेत. दरम्यान बचाव पथकाला पाचारण करण्यात आले असून बचावकार्य सुरू आहे. त्याचसोबत तिवसातील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरले असून आतोनात नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यात काल रात्री पासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली असून संततधार पावसामुळे जिल्ह्यातील तिवसा शहरातील सखल भागात पाणी शिरल्याने नागरिकांचे नुकसान झाले आहे.