मुंबई : संकटाच्या काळात राजकारण न करता मदत करणे हा महाराष्ट्राचा संस्कार आहे. हा संस्कार आपण पाळत असून त्यावर अधिक भाष्य न करता आपण आजघडीला जनतेच्या आरोग्यावर आलेले संकट दूर करण्यास प्राधान्य दिले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहताना जनहितासाठी कृषी, शिक्षण, उद्योग आणि अर्थ या क्षेत्राकडे लक्ष केंद्रित केल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी आज समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी रमजान ईद निमित्ताने राज्यातील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. सर्वधर्मियांनी आतापर्यंत घरातच सण, उत्सव आणि समारंभ साजरे केले असल्याचे सांगताना त्यांना घरात राहूनच नमाज अदा करण्याचे व संपूर्ण जग कोरोनामुक्त होण्यासाठी अल्लाहकडे प्रार्थना करण्याचे आवाहन केले.
लॉकडाऊन एकदम लागू करणे जसे योग्य नव्हते तसेच लॉकडाऊन एकदम उठवणेही योग्य नसल्याचे, हळूहळू आपली आयुष्याची गाडी पूर्वपदावर आणताना जपून पावले टाकत असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. टाळेबंदी उठवताना काळजीपूर्वक सुरु केलेल्या गोष्टी गर्दी करून आणि बेशिस्तीने वागून पुन्हा बंद होणार नाही याची काळजी प्रत्येक नागरिकाने घेण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.
Read More कम्युनिटी रेडिओचे जाळे विस्तारणार
हे राज्यातील जनतेसाठीचे पॅकेज :
हे सरकार अनेक प्रकारे राज्यातील जनतेला मदत करत आहे. रेशनकार्ड नसलेल्या लोकांना अन्नधान्य देण्याची राज्य शासनाची मागणी केंद्र शासनाने आता मान्य केली आहे. त्याबद्दल आपण केंद्र शासनाला धन्यवाद देतो असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, शिवभोजन योजनेअंतर्गत ५ रुपये थाळी याप्रमाणे रोज लाखो थाळ्यांचे वितरण होत आहे. गोरगरिबांना जेवणाची सोय उपलब्ध होत आहे. उपचार, अन्नधान्याचे आणि जेवणाचे वितरण हाही मदतीचाच एक भाग आहे.
राज्यातील १०० टक्के नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यात आला आहे. निवारा केंद्रात असलेल्या परराज्यातील साडेपाच ते सहा लाख मजुरांना नाश्त्यासह दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली गेली आहे.
राज्य शासनाला या श्रमिकांचे ओझे नव्हतेच; परंतु मजूर घरी जाऊ इच्छित होते त्यांना ट्रेनच्या माध्यमातून घरी जाण्याची मान्यता मिळवल्यानंतर सुमारे ७ लाख मजूर ४८१ ट्रेन्सच्या माध्यमातून त्यांच्या राज्यात गेले. यांच्या प्रवासी भाड्याची ८५ टक्क्यांची रक्कम केंद्र सरकार राज्याला देईल तेव्हा देईल परंतु त्या आधी राज्य शासनाने मजुरांच्या प्रवास शुल्कासाठी १०० टक्के खर्च करत आतापर्यंत ८५ कोटीहून अधिक रक्कम उपलब्ध करून दिली आहे. राज्याची रोज ८० ट्रेन सोडण्याची मागणी असताना केवळ ३० ते ४० ट्रेन्स उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मजुरांची व्यवस्थित नोंदणी करून त्यांना चांगल्या पद्धतीने पाठवले जात आहे त्यामुळेच जातांना परराज्यातील हे मजूर महाराष्ट्राचा जयजयकार करत परतत आहेत असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
रेल्वेप्रमाणेच राज्याच्या ३२ हजाराहून अधिक बसेसद्वारे ३ लाख ८० हजार मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत किंवा रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचवण्यात आले आहे. यावर राज्य शासनाने ७५ कोटी रुपये खर्च केले आहेत. हवाई मार्गाने येणाऱ्या लोकांना क्वारंटाईन केले जात असून योग्य तयारीसह आणि नियोजनासह ही सेवा सुरु करावयाची असल्याचे मुख्यमंत्र्यानी स्पष्ट केले.
परिक्षांबाबतही लवकरात लवकर निर्णय होईल, पालकांनी काळजी करू नये
जूनमध्ये शाळा आणि शेतीचा हंगाम सुरु होत असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबणार नाही, अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबतही लवकरात लवकर निर्णय होईल, पालकांनी काळजी करू नये.