नवी दिल्ली : अनलॉक १.० अंतर्गत धार्मिक स्थळं आजपासून पुन्हा सुरु होणार आहेत. परंतु यावेळी आपणास पूर्वीसारखी गर्दी करता येणार नाही. तसेच नवीन नियमांतर्गत सोशल डिस्टन्सिंगसारख्या नियमांचे देखील पालन करावे लागेल. मंदिरे असोत की मशिद, चर्च असो वा गुरुद्वारा या सर्व धार्मिक स्थळी सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे.
देशातील प्रमुख मंदिरे उघडण्याच्या सर्व तयारी यापूर्वीच झाली आहे. तसंच स्वच्छतेचे काम देखील अगोदरच पार पाडण्यात आले आहे. प्रसाद वितरण आणि फुलं अर्पण करण्यास बंदी, शरीराचे तापमान मोजण्यासाठी थर्मल गनचा वापर करणे, आरोग्य सेतू अॅपचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे. यासारखी अनेक पावले मंदिर प्रशासनाकडून उचलण्यात आली आहेत. मंदिरांमध्ये सॅनिटायझर्सची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.
दिल्ली, प्रयागराज, उत्तराखंड, मथुरा, उज्जैन अशा धार्मिक ठिकाणी सर्व प्रकारच्या तयारी करण्यात आल्या आहेत. भाविकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय मुख्य गेटच्या आधी थर्मल गनद्वारे भाविकांचे तापमान देखील तपासले जाईल.मंदिरांप्रमाणेच मशिदी उघडण्यासाठीही पूर्ण तयारी करण्यात आली आहे. दिल्लीच्या प्रसिद्ध जामा मशिदीत स्वच्छता पूर्ण झाली आहे. जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, सोमवारपासून प्रसिद्ध जामा मशिद उघडेल. जिथं आरोग्याच्या दृष्टीने सर्व सुरक्षेच्या उपाययोजना केल्या आहेत.
Read More विषाची चारा खाल्ल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज : तब्बल 15 गायींचा मृत्यू
नियमांचे पालन करावे लागेल
धार्मिक ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या वस्तू अर्पण करण्यास सध्या तरी बंदी असणार आहे. याशिवाय येथे सॅनिटायझेशन टनलची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे येणार्या लोकांना सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करून मास्क घालणं बंधनकारक असणार आहे. मंदिरात घंटा वाजवणे किंवा मूर्तीला स्पर्श करण्यास मनाई असणार आहे. तसेच गर्भवती किंवा वृद्धांना देखील मनाई आहे.
‘या’ राज्यांमध्ये धार्मिक स्थळं बंदच!
दरम्यान, अशी काही राज्ये आहेत जिथे अद्याप धार्मिक स्थळे सुरु करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. यामध्ये महाराष्ट्र, हरियाणा आणि अरुणाचल प्रदेश यासारख्या राज्यांचा समावेश आहे.