97 टक्के भागात सर्व सुविधा सुरु : पालिका आयुक्त शेखर गायकवाड
पुणे : तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन 17 तारखेलासंपणार आहे. त्यामुळे सहाजिकच पुणेकरांच्या नजरा या पुण्यातील पुढील निर्बंध कसे असतील याकडे लागलेल्या आहेत. पुण्यातील 3 टक्के कंटेनमेंट झोनमधील निर्बंध कायम राहतील आणि 97 टक्के भागात जास्त सुविधा मिळणार आहे, अशी माहिती पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.
कंटेनमेंट झोनमधील सामान्य माणसाला त्रास होणार नाही
कंटेनमेंट झोन हा छोटा आणि मर्यादित केलेला आहे. तिथे सध्याची कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता काही उघडले जाण्याची आणि शिथिलता आणण्याची शक्यता फार कमी असल्याचं आयुक्तांनी म्हटलं. दुसरीकडे, शहरात मात्र अधिकाधिक दुकानं आणि व्यापारी आस्थापनं उघडले जातील. खाजगी व्यवस्था, व्यापारी आस्थापनं सरकारी कार्यालय 100% सुरु करणे आणि सर्व प्रकारचे उद्योगधंदे सुरु करण्याचा विचार आहे. या महत्त्वाच्या तीन गोष्टींवर सरकारचे आदेश अपेक्षित असल्याचे आयुक्तांनी म्हटलं. हे करत असताना कंटेनमेंट झोनमधील सामान्य माणसाला त्रास होणार नाही. त्याला सुसह्य होईल, रोजगार मिळाला आणि जीवनावश्यक वस्तू मिळाल्या पाहिजेत, असा दुहेरी प्रयत्न सुरु आहे, असंही आयुक्तांनी म्हटलं.
Read More संरक्षण क्षेत्रात 74 % FDI,तर कोळसा उद्योगाला 50 हजार कोटी
31 मेपर्यंत पुण्यात 5 हजार कोरोना रुग्ण असतील
त्याचबरोबर सध्याच्या नियमावलीनुसार 31 मे अखेर पुण्यात 5 हजार रुग्ण असतील आणि 2 हजार क्वारंटाईन असतील, असेही आयुक्तांनी सांगितलं. तर स्वॅब टेस्टिंग मागच्या आठवड्यात 900 पर्यंत घेत होतो मात्र, आता ते 1200 पर्यंत पोहोचले. त्यामुळे जास्त रुग्ण आढळून येत आहेत. तर रुग्ण डबल होण्याचा कालावधी हा 13 दिवसांवर आलेला आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिली.
कोरोना मृत्यूदर तो 5.4 टक्क्यांवर घसरला
पुण्याचा कोरोना मृत्यूदर हा एकेकाळी 14 टक्क्यांवर म्हणजेच देशात सर्वाधिक होता. मात्र, सध्या पुण्याचा कोरोना मृत्यूदर तो 5.4 टक्क्यांवर घसरला आहे. तो राज्याच्या आणि राष्ट्रीय दरापेक्षा जास्त असला तरी टेस्टिंग वाढल्यानंतर पंधरा दिवसानंतर आपण स्टेट आणि नंतर नॅशनल बरोबर येऊ, असंही पालिका आयुक्तांनी सांगितलं.