मुंबई : पोलिस दलातून सेवानिवृत्त झालेले कर्मचा-यांना बीडीडी चाळीत आता हक्काचे घर मिळणार आहे. अशी घोषणा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
बीडीडी चाळीत २२५० निवृत्त पोलिसांना घर मिळणार आहे. त्यासाठी पोलिस कर्मचा-यांनी ५० लाख रुपये घरासाठीकिंमत द्यावी लागणार आहे. अशी माहिती आव्हाड यांनी आपल्या अधिकृत ट्विटवर दिली आहे.
बीडीडी चाळीच्या प्रत्येक घराचा बांधकाम खर्च हा अंदाजे १ कोटी ५ लाख ते १ कोटी १५ लाख इतका आहे. पण म्हाडाने येथे असलेल्या २२५० पोलीस कर्मचा-यांना तोटा सहन करून ५० लाख रुपयांमध्ये घर देण्याचा निर्णय घेतला आहे.
हा निर्णय करारपत्रात नमूद करून करारपत्र त्वरीत दिली जातील. ह्या निमित्ताने सर्व काम मार्गी लागलेलं आहे. तेव्हा आता निवृत्त पोलिसांनी लवकरात लवकर आपली घरे खाली करावीत अशी त्यांनी विनंती केली आहे.
गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेल्या बीडीडी चाळ पुनर्विकासाचे काम पुर्ण झालं आहे. नायगाव बीडीडी चाळीतील दोन चाळी केईएम रुग्णालयातील कर्मचा-यांना देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये अनेक वर्षांपासून रुग्णालयाचे कर्मचारी राहत होते.
राज्य सरकारने बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाची जबाबदारी म्हाडाकडे सोपवली आहे. त्यानुसार म्हाडाने वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगावमधील प्रकल्पाच्या कामासाठी कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे.
नागरिकांच्या पुनर्वसनासाठी २२ मजल्यांचे टॉवर उभारण्यात येणार आहेत. दुस-या टप्प्यात १९ चाळी तोडण्यात येतील. तेथे विक्री घटकासाठी ६० मजल्यांचे टॉवर उभारण्यात येणार आहेत.