केपटाऊन : महिला टी-२० विश्वचषकात इंग्लंडच्या महिला संघाने भारतावर ११ धावांनी विजय मिळवला. इंग्लंडने दिलेल्या १५२ धावांच्या आव्हानाचा सामना करताना भारताचा संघ पाच विकेटच्या मोबदल्यात १४० धावांपर्यंतच पोहोचला. विश्वचषकातील भारताचा हा पहिला पराभव आहे. याआधी भारताने पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज संघाचा पराभव करत विश्वचषकाची सुरुवात दणक्यात केली होती. पण इंग्लंड संघाने भारताचा पराभव केला.
इंग्लंडने दिलेले १५२ धावांच्या आव्हानाचा सामना करताना भारताला पराभवाचा सामना करावा लागला. हरमनप्रीतच्या नेतृत्वातील भारतीय संघाने निर्धारित २० षटकात पाच विकेटच्या मोबदल्यात १४० धावांपर्यंतच मजल मारली. भारताकडून स्मृती मंधाना आणि ऋचा घोष यांनी दमदार खेळी केली. पण संघाला विजय मिळवून देण्यात त्यांना अपयश आले. स्मृती मंधानाने ४१ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान ७ चौकार आणि एक षटकार लगावला. तर ऋचा घोष हिने पुन्हा एकदा मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करत विजयाच्या आशा उंचावल्या होत्या. ऋचाने अखेरच्या क्षणी ३४ चेंडूत ४७ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान ऋचाने चार चौकार आणि दोन षटकार लगावले.
स्मृती मंधानाचे दमदार अर्धशतक आणि ऋचा घोषची विस्फोटक खेळी भारताला विजय मिळवून देऊ शकली नाही. या दोन फलंदाजांचा अपवाद वगळता एकालाही मोठी खेळी करता आली नाही. सलामी फलंदाज शेफाली वर्मा ११ चेंडूत ८ धावा काढून बाद झाली, तर जेमिमा रॉड्रिग्स १६ चेंडूवर १३ धावांची खेळी केली. त्याशिवाय कर्णधार हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांनी अनुक्रमे ४ आणि ७ धावांची खेळी केली. इंग्लंडच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा केला. साराह ग्लैन हिने ४ षटकात २७ धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. त्याशिवाय लॉरेन बेल आणि सोफी एक्सेलेटन यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
नाणेफेकीचा कौल
भारताच्या बाजूने, पण..
भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणा-या इंग्लंड संघाने निर्धारित २० षटकात १५२ धावांचे लक्ष दिले. इंग्लंडसाठी नेट सीवर ब्रंट हिने सर्वाधिक ५० धावा केल्या. यादरम्यान तिने पाच चौकार लगावले. हीथर नाइटने २३ चेंडूत २८ धावांची खेळी केली. त्याशिवाय एमी जोन्सने ४० धावांचे योगदान दिले. या खेळीत तिने तीन चौकार आणि दोन षटकार लगावले. भारताकडून रेणुका सिंह सर्वात यशस्वी गोलंदाज राहिली. रेणुकाने चार षटकात १५ धावा खर्च करताना पाच विकेट घेतल्या. त्याशिवाय शिखा पांडे आणि दीप्ती शर्मा यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.