22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeराष्ट्रीयउष्णतेमध्ये तिप्पट वाढ होण्याचा धोका

उष्णतेमध्ये तिप्पट वाढ होण्याचा धोका

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : क्लायमेट चेंज अर्थात हवामान बदलामुळे पृथ्वीवरील भीषण नैसर्गिक संकटांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. हा दावा संयुक्त राष्ट्राने नुकत्याच जारी झालेल्या एका अहवालात केला आहे. त्यानुसार २०३० पर्यंत जगाला दरवर्षी ५६० आपत्तींचा सामना करावा लागेल. सध्या २०१५ पासून जग वार्षिक ४०० संकटांचा सामना करत आहे. युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शनच्या अहवालात १९७० ते २००० पर्यंत आपत्तीची वार्षिक संख्या ९० ते १०० च्या आसपास होती. ही मध्यम ते मोठ्या प्रमाणावरील संकटांची आकडेवारी आहे. यूनोच्या अहवालात २०३० पर्यंत दुष्काळ पडण्याच्या प्रकरणांत ३० टक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला.

या अहवालानुसार २००१ च्या तुलनेत २०३० मध्ये उष्ण वारे अर्थात उष्णतेच्या लाटांचे प्रमाण ३ पट वाढेल. तसेच दुष्काळ पडण्याच्या प्रकरणांतही ३० टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे गत मार्च महिन्यातच वाढत्या तापमानाने १२१ वर्षांतील उच्चांक मोडला होता. संशोधनात सहभागी शास्त्रज्ञांच्या मते हवामान बदलामुळे केवळ नैसर्गिक संकटच नाही, तर कोरोना महामारी, आर्थिक संकट व अन्नधान्याचा तुटवडाही वाढत आहे. अशा अनेक संकटांमागे क्लायमेट चेंजचा हात असण्याचा अंदाज आहे. पण मानवाला त्याची कोणतीही खबरबात नाही, ही सध्या चिंतेची बाब आहे.

यूएनडीआरआरच्या प्रमुख मिज्युटरी यांच्या माहितीनुसार नैसर्गिक संकटांमुळे किती नुकसान सोसावे लागले, याची जनतेला कोणतीही कल्पना नाही. मिज्युटोरी म्हणतात की, आपण आजच ठोस पाऊले उचलली नाही तर नुकसान भरून काढणे अत्यंत अवघड होईल. हे एक दुष्टचक्र आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर यासंदर्भात ठोस पावले उचलून आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. जागतिक स्तरावर याबाबत प्रयत्न केले जात आहेत. मात्र, अजूनही गांभीर्याने पावले उचललेले गेले नाहीत. त्यामुळे केंद्र सरकार पुढील काळात काय भूमिका घेते, याकडे लक्ष असणार आहे.

गरीब देशांची स्थिती आणखी होणार बिकट
संशोधनात सहभागी हॉवर्ड म्यूमॅनेटेरियन इनिशिएटीव्हचे मार्कस इनेकनेल म्हणाले की, भविष्यात येणा-या भयावह संकटांचा सर्वाधिक फटका गरीब देशांतील नागरिकांना बसेल. या देशांना आपत्तीतून सावरण्यासाठी लागणारा पैसा गोळा करता येणार नाही. त्याचा त्यांच्या अर्थव्यवस्थेला जबर फटका बसेल.

अनेक देश उद््ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर
यूएस नॅशनल ओशनिक अँड अ‍ॅटमॉस्फेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचे वैज्ञानिक रॉजर पूलव्हर्टी म्हणतात की, अनेक आजारांमुळे रोगप्रतिकारक क्षमता दुबळी होणे, जंगलातील वणव्यांसह उष्ण वारे वाहणे व युक्रेन युद्धामुळे अन्नधान्य व इंधन तुटवडा निर्माण होणे हेही एक संकटच आहे. यामुळे अनेक देश उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत.

पूर्वतयारी हाच एकमेव मार्ग
पूलव्हर्टी यांच्या मते गत अनेक वर्षांपासून आपत्तींमुळे होणा-या मृत्यूंत घट नोंदवण्यात येत होती. पण गत ५ वर्षांपासून हा आकडा वाढताना दिसून येत आहे. मिज्युटोरी यांच्यानुसार यामागे कोरोना महामारीचे एक मोठे कारण आहे. तथापि, त्यांनी चक्रीवादळ किंवा भूकंपाचे मोठ्या संकटात रुपांतर नाही, याची काळजी घेण्यासाठी योग्य नियोजनाची गरज व्यक्त केली आहे. यामुळे आपल्याला खूप नुकसान टाळता येईल, असे त्या म्हणाल्या.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या